कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी POSH कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीम सुरू
महिलांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळासाठी राज्य सरकारने POSH कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे पालन होत आहे का यासाठी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
मुंबई, दि. १६ मे २०२६ : राज्यातील महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि संवेदनशील कार्यस्थळ उपलब्ध व्हावे यासाठी महिला व बाल विकास विभागाने ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ अर्थात POSH कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक काढण्यात आले असून विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.
राज्यातील ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती (Internal Committee - IC) स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. समितीत किमान ५० टक्के महिला सदस्य असणे आवश्यक असून वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच समितीत बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचाही समावेश असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ई-मेल, लेखी अर्ज तसेच SHE-Box पोर्टल यांसारखी विविध माध्यमे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत कार्यवाही सुरू करणे, चौकशीदरम्यान गोपनीयता राखणे आणि आवश्यकतेनुसार पीडित महिलेला अंतरिम दिलासा देणे याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महिला व बाल विकास विभागाने POSH अनुपालनासाठी विशेष तपासणी सूची तयार केली असून त्यामध्ये POSH धोरण, जनजागृती कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल, सुरक्षित कार्यस्थळ आणि SHE-Box पोर्टलवरील नोंदणी अशा ३१ महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून प्रत्येक आस्थापनामध्ये कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का याची पडताळणी केली जाणार आहे.
तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास POSH Act 2013 च्या कलम २६ नुसार संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाची ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0