पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनणार; पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत उन्नत मार्गांचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योग, आयटी, लॉजिस्टिक्स आणि नागरिकांच्या प्रवासाला मोठा वेग मिळणार असून, २०३० पर्यंत पुणे देशाचे प्रमुख 'ग्रोथ इंजिन' बनण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Jul 18, 2026 - 23:37
 0  6
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनणार; पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत उन्नत मार्गांचे भूमिपूजन
पुणे, पुणे विकास, पुणे उन्नत मार्ग, पुणे-शिरूर महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर कॉरिडॉर, हडपसर-यवत उन्नत मार्ग,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

पुणे, दि. १८ जुलै : पुणे शहराला देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान विकास केंद्र बनविण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकत पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग (Elevated Corridor) प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांमुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे 'ग्रोथ इंजिन' म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार, आमदार आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' (BOT) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या तीन प्रकल्पांमधून राज्य शासनाला एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार आहे. या उन्नत मार्गांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन औद्योगिक, आयटी आणि निवासी भागांमधील संपर्क अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे.

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या तिन्ही उन्नत मार्गांवरून मेट्रो मार्गिका विकसित करता यावी यासाठी आतापासूनच आवश्यक डिझाइन तयार करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मेट्रो उभारणीचा खर्च सुमारे ४० टक्क्यांनी कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, १७३ किमी बाह्य रिंग रोड, ८६ किमी अंतर्गत रिंग रोड, तसेच दिवेघाट दुहेरी बोगदा यांसारख्या प्रकल्पांचाही उल्लेख केला. या सर्व प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी सुमारे ३० टक्क्यांनी कमी होईल आणि शहराच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या विकासाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर करण्यासाठी जायका आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या तिन्ही उन्नत मार्गांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात उपाय होईल, असे सांगितले. अत्याधुनिक Ultra High Performance Fiber Reinforced Concrete (UHPFRC) तंत्रज्ञानामुळे कमी खांबांवर अधिक मजबूत पूल उभारणे शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर महामार्गामुळे उत्तर-दक्षिणेकडील मोठ्या प्रमाणातील वाहतूक पुणे आणि मुंबई शहरात न शिरता बाहेरून वळविणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या तिन्ही प्रकल्पांना पुण्याच्या विकासासाठी 'गेम चेंजर' ठरतील, असे म्हटले. चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा, आयटी क्षेत्र, लॉजिस्टिक्स आणि रोजगारनिर्मितीला या प्रकल्पांमुळे मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्राला

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे सांगितले. पुण्यात ३०० किलोमीटरहून अधिक सायकल ट्रॅक विकसित करण्याचेही नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

तीन उन्नत मार्ग प्रकल्पांची वैशिष्ट्ये

पुणे-शिरूर उन्नत मार्ग : ५४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात ३१ किलोमीटर सहापदरी उन्नत मार्ग, समांतर चारपदरी रस्ता आणि भविष्यातील मेट्रोची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुणे-शिरूर प्रवासाचा कालावधी दीड-दोन तासांवरून अवघ्या ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.

हडपसर-यवत उन्नत मार्ग : ३१.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात २५ किलोमीटर बहुस्तरीय उन्नत मार्ग आणि सहापदरी रस्ता विकसित केला जाणार असून, पुरंदर विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग-६५ आणि पुणे रिंग रोडशी थेट जोडणी मिळणार आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर कॉरिडॉर : ५३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात २६ किलोमीटर उन्नत महामार्ग आणि ५३.२ किलोमीटर चारपदरी भूपृष्ठीय रस्ता उभारण्यात येणार आहे. यामुळे चाकण औद्योगिक पट्ट्याला जलद संपर्क मिळून उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

या तिन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार असून, उद्योग, आयटी, स्टार्टअप, डीप टेक आणि जागतिक क्षमता केंद्रांच्या वाढीस चालना मिळून पुणे २०३० पर्यंत देशातील अग्रगण्य विकास केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0