पुणे महापालिकेचा ‘Citizen Open Day’ प्रभावीपणे राबवा; आपची आयुक्तांकडे मागणी
पुणे महापालिकेतील नागरिकांसाठी दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘Citizen Open Day’ प्रभावीपणे राबवावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पुणे, दि. ७ सप्टेंबर २०२६ : पुणे महानगरपालिकेतील नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद वाढविण्यासाठी दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘Citizen Open Day’ प्रभावीपणे राबवावा, तसेच या कालावधीत सर्व संबंधित खातेप्रमुख आणि जबाबदार अधिकारी नागरिकांसाठी कार्यालयात किंवा दालनात उपलब्ध राहावेत, अशी मागणी आम आदमी पार्टी, पुणे शहराचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
महापालिकेने यापूर्वी जारी केलेल्या कार्यालयीन परिपत्रकानुसार नागरिकांना दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत महापालिकेतील अभिलेख व दस्तऐवज पाहणीसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
याशिवाय महाराष्ट्र शासनाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी जारी केलेल्या शासन निर्णय/परिपत्रकाद्वारे नागरिकांना कार्यालयीन अभिलेखांची पाहणी करण्यासाठी निश्चित वेळ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला व्यापक स्वरूप दिल्याचा दावा आपकडून करण्यात आला आहे.
‘Open Day’ केवळ कागदावर नको
प्रत्यक्षात अनेक वेळा सोमवारी दुपारी ३ ते ५ या नागरिकांसाठी निश्चित केलेल्या वेळेत खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित अधिकारी बैठका, दौरे अथवा अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेता येत नाही, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
त्यामुळे ‘Citizen Open Day’ ही व्यवस्था केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.
आपच्या मते, नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या महापालिका प्रशासनात नागरिकांनाच अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर हे लोकशाही आणि उत्तरदायी प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत नाही.
आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या
आपने ‘Citizen Open Day’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये—
दर सोमवारी दुपारी ३ ते ५ हा Citizen Open Day कोणत्याही परिस्थितीत प्रभावीपणे सुरू ठेवावा.
या वेळेत सर्व संबंधित खातेप्रमुख व जबाबदार अधिकारी कार्यालयात किंवा दालनात उपलब्ध राहणे बंधनकारक करावे.
Open Dayच्या वेळेत नागरिकांच्या भेटींना प्राधान्य देऊन शक्यतो नियमित बैठका आयोजित करू नयेत.
अत्यावश्यक शासकीय कारणास्तव अधिकारी अनुपस्थित असल्यास त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
प्रत्येक विभागाच्या कार्यालयाबाहेर “Citizen Open Day – Monday, 3 PM to 5 PM” अशी स्पष्ट माहिती लावावी.
संबंधित अधिकारी, त्यांचे पदनाम आणि विभागाची माहिती नागरिकांसाठी सार्वजनिक करावी.
अधिकारी उपस्थितीची Attendance/Visitor Register किंवा डिजिटल नोंदणी व्यवस्था सुरू करावी.
नागरिकांना अभिलेख पाहणी, अधिकाऱ्यांशी संवाद आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर निश्चित करावी.
Open Dayचे पालन होत आहे की नाही, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी करावी.
आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी.
‘नागरिक कर भरतात, त्यामुळे प्रशासनाने उपलब्ध राहणे आवश्यक’
“नागरिक कर भरतात आणि त्याच करातून महानगरपालिकेचा कारभार चालतो. त्यामुळे नागरिकांना भेटण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेली वेळ ही केवळ औपचारिकता राहता कामा नये. नागरिकांना अधिकारी भेटत नसतील, तर ‘Citizen Open Day’चा नेमका उद्देशच काय?” असा सवाल सुदर्शन जगदाळे यांनी उपस्थित केला.
भाजपच्या सत्ताकाळात नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून प्रशासन नागरिकांपासून दूर ठेवण्याची पद्धत निर्माण झाली असेल, तर ती बदलण्याची गरज असल्याचेही जगदाळे यांनी म्हटले. पुणेकरांना त्यांच्या हक्काची माहिती, अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि पारदर्शक प्रशासन मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आपचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी ही मागणी कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून पुणेकरांना पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख प्रशासन मिळावे, या उद्देशाने करण्यात आल्याचे सांगितले.
आयुक्तांनी तातडीने आदेश काढावेत
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन स्पष्ट आदेश काढावेत, Citizen Open Dayची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी आणि त्या आदेशाची प्रत सार्वजनिक करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
तसेच सर्व विभागांना विद्यमान शासन निर्देश आणि महापालिका परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन नागरिकांना त्यांच्या हक्काची सेवा प्रत्यक्ष मिळत आहे की नाही, याची वरिष्ठ पातळीवर तपासणी करावी, अशी मागणीही आपकडून करण्यात आली आहे.
आपचे पदाधिकारी उपस्थित
या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आपचे महासचिव सुभाष कारंडे, युवा उपाध्यक्ष मिलिंद ओव्हाळ, उपाध्यक्ष संतोष काळे, कुमार धोंगडे, अरुण केदारी, शिक्षक आघाडी अध्यक्ष शितल कांडेलकर, सुनिता काळे, माधुरी गायकवाड, अविनाश भाकरे, संजय रणधीर आणि अक्षय वायदंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
— आम आदमी पार्टी, पुणे