पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी; विलंबाबाबत कडक निर्देश

पुणे महानगरपालिका, Omprakash Divte, Pune projects review, flyover work Pune, PMC infrastructure, Pune development news

Apr 15, 2026 - 02:24
 0  1
पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी; विलंबाबाबत कडक निर्देश
पुणे महानगरपालिका, Omprakash Divte, Pune projects review, flyover work Pune, PMC infrastructure, Pune development news

पुणे प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत सुरू असलेल्या विविध महत्त्वाच्या कामांची आज (दि. १० एप्रिल २०२६) अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या पाहणीची सुरुवात साधू वासवानी पूल येथून करण्यात आली. त्यानंतर आगा खान नदी पूल, शास्त्रीनगर उड्डाणपूल व अंडरपास, विश्रांतवाडी उड्डाणपूल व अंडरपास तसेच बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल या प्रकल्पांची सविस्तर पाहणी करण्यात आली.

यावेळी प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती, अडचणी तसेच पुढील कामाचे नियोजन याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. काही प्रकल्पांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत अतिरिक्त आयुक्तांनी गांभीर्याने नोंद घेत संबंधित कंत्राटदारांना निर्धारित वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले.

प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगत प्रत्येक प्रकल्पासाठी सविस्तर ‘बार चार्ट’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या चार्टचे सूक्ष्म परीक्षण अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.

तसेच, प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला नियमित बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक बैठक कार्यालयात तर दुसरी थेट प्रकल्पस्थळी घेण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून विविध महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0