भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वरळी सी फेस येथे ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय तिरंगा यात्रा ही केवळ रॅली नसून देशप्रेम, राष्ट्रभावना आणि नवभारत घडविण्याची प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. १० : भारतीय तिरंगा हा केवळ हातात घेण्याचा ध्वज नसून तो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आणि अंतःकरणात वसलेली राष्ट्रभावना आहे. भारतीय संविधानाचा सन्मान, देशाचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांमधून नवभारत घडविण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली, तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल. तिरंगा यात्रा ही केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना जागृत करणारा उपक्रम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वरळी सी फेस येथे आयोजित ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करत देशाचा विकास, राष्ट्रभावना आणि नवभारताच्या संकल्पनेवर भाष्य केले.
या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, योगेश सागर, मिहिर कोटेचा, कॅप्टन तमिळ सेल्वन, राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आज येथे दोन सागर दिसत आहेत’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वरळी सी फेसवर आज दोन सागर पाहायला मिळत आहेत. एक समोर असलेला हिंद महासागर, तर दुसरा म्हणजे हातात तिरंगा घेऊन एकत्र आलेल्या नागरिकांचा तिरंग्याचा महासागर. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, तर सीमेवर सैनिकांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशवासीयांनीही स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. अशा त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेला भारतीय तिरंगा चंद्र-सूर्य असेपर्यंत सदैव उंच फडकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताची विविध क्षेत्रांत मोठी झेप
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली असून, देशाची आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटचाल वेगाने सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतामध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम विकसित होत असून, देशाकडे मोठी युवा शक्ती आहे. तिरंगा हातात घेऊन देशाच्या प्रगतीसाठी पुढे येणाऱ्या या तरुणाईला थांबविण्याची ताकद जगातील कोणत्याही शक्तीकडे नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
भारताच्या विकासाचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही
भारताची वेगाने होत असलेली प्रगती काही शक्तींना खटकत असून, काही परकीय शक्ती भारताची घोडदौड थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, भारताचा विकासाचा प्रवास कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नवभारताच्या संकल्पनेतून आगामी काळात भारत विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर अग्रस्थानी दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
वरळी सी फेसवर देशभक्तीचा उत्साह
‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीसाठी वरळी सी फेस येथे हजारो मुंबईकर एकत्र आले होते. हातात तिरंगा घेतलेले नागरिक, युवक, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.
‘भारत माता की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले. तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशासाठी योगदान देण्याची भावना नागरिकांमध्ये जागृत करण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0