महायुतीचे उमेदवार म्हणून सचिन अहिर यांचा विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या बहुमताच्या जोरावर अहिर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Jul 1, 2026 - 15:15
 0  14
महायुतीचे उमेदवार म्हणून सचिन अहिर यांचा विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
सचिन अहिर, विधानपरिषद उपसभापती, एकनाथ शिंदे,

मुंबई | प्रतिनिधी (दीपक शिंदे)

महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सचिन अहिर हे धनुष्यबाण चिन्हावर विधान परिषदेत निवडून आले असून त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले असल्याचे सांगितले. त्यामुळे ते शिवसेनेचेच आमदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका करत, "आठवडाभरापूर्वी खासदारांनी षटकार ठोकला, आज आमदार सचिन अहिर यांनी षटकार ठोकला. यापुढेही चौकार-षटकार सुरूच राहतील आणि त्यांच्यातील एक-एक विकेट पडेल," असे सूचक वक्तव्य केले.

विधानसभा आणि विधानपरिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने येत्या बुधवारी सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापतीपदी निवड निश्चित असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईपुरतेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सदस्यांना न्याय देणारे उपसभापती म्हणून ते काम करतील, असेही त्यांनी सांगितले.

"आम्ही तोडकाम नाही तर जोडकाम करतो. काही लोक तुडवायला आले, तर आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी आलो आहोत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर आम्ही पुढे वाटचाल करत आहोत," असेही एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार ओमराजे निंबाळकर, प्रवक्ते किरण पावसकर, राहुल लोंढे, शीतल म्हात्रे तसेच शिवसेनेचे नेते, उपनेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2