कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील; उद्धव ठाकरेंवरही संजय शिरसाठ यांची टीका

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच विधानपरिषद उपस्थितीवरून उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

May 18, 2026 - 19:44
 0  5
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील; उद्धव ठाकरेंवरही संजय शिरसाठ यांची टीका
संजय शिरसाठ, कांदा प्रश्न, कांदा उत्पादक शेतकरी

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबई :

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केले. तसेच विधानपरिषद उपस्थितीवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

कांद्याच्या दरघटीमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे मान्य करताना संजय शिरसाठ म्हणाले की, “कांदा मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना एक रुपया किंवा त्यापेक्षा कमी भाव मिळत आहे. एवढी मेहनत करून कवडीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने १२ रुपये ३५ पैसे दर देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत शिरसाठ म्हणाले, “या निर्णयावर आम्ही पूर्णपणे समाधानी नाही, मात्र पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी काही भरीव मदत देता येईल का, यावर सरकार विचार करत आहे.”

काही संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनांबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, “लोक आंदोलन करत असतील तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. शेतकरी वाचला पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे.”

दरम्यान, विधानपरिषदेमधील उपस्थितीवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “साडे बत्तीस टक्के उपस्थितीही जास्तच झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे हे क्षेत्र नाही. ते फक्त मुख्यमंत्रीपदासाठी विधान परिषदेत आले होते,” असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात येणे, पत्रकार परिषद घेणे आणि मत व्यक्त करून जाणे एवढाच त्यांचा विधान परिषदेशी संबंध राहिला आहे. सर्वात कमी उपस्थिती असलेले आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते.”

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0