महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण – मंत्री आदिती तटकरे
महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व घरगुती वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. सचिवालय जिमखाना येथे प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई, दि. ४ : महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशा उत्पादनांची विक्री शासकीय कार्यालये, वसतीगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी करण्यात आल्यास नोकरदार महिलांना दर्जेदार वस्तू सहज उपलब्ध होतील, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
सचिवालय जिमखाना येथे ‘शक्ती ऑन व्हील्स’ या प्रदर्शनी व फिरत्या विक्री व्हॅनचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अनिर्वेदशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फाउंडेशनच्या संस्थापक व निवृत्त सनदी अधिकारी आर. विमला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे.
यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, विविध जिल्ह्यांतील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी आणि ही उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री वाढल्यास महिला उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.
शासकीय कार्यालये, तहसील कार्यालये, प्रांत कार्यालये तसेच मेट्रो स्थानकांच्या परिसरात अशा विक्री व्हॅन कार्यरत करण्यात आल्यास महिला उद्योजकांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
रेडी-टू-ईट पदार्थ, मिलेटपासून तयार करण्यात आलेली उत्पादने, घरगुती वस्तू आणि दैनंदिन वापरातील विविध साहित्य नोकरदार महिलांना त्यांच्या कार्यस्थळी सहज उपलब्ध झाल्यास त्यांचा वेळ वाचेल. त्याचबरोबर दैनंदिन गरजा पूर्ण करणे अधिक सुलभ होईल, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
फाउंडेशनच्या संस्थापक आर. विमला यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरणासाठी अनेक संस्था विविध स्तरांवर कार्य करीत आहेत. मात्र, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून दिल्यास उत्पादनांची मागणी वाढू शकते. त्यातून महिला बचत गटांच्या उद्योगाला आणि आर्थिक प्रगतीलाही चालना मिळेल.
‘शक्ती ऑन व्हील्स’ या फिरत्या विक्री व्हॅनमध्ये पापड, लोणची, तूप, विविध प्रकारची पिठे, रेडी-टू-ईट पदार्थ तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ही उत्पादने सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आली असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर करण्यात आलेला नसल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
महिला स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्पादन तयार करणाऱ्या महिलांना नियमित बाजारपेठ मिळाल्यास त्यांचा व्यवसाय वाढण्यास आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.
मुंबई शहरातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, आगामी काळात राज्यभर तसेच देशभरात किमान १०० फिरत्या विक्री व्हॅन सुरू करण्याचा मानस असल्याचे आर. विमला यांनी सांगितले.
या फिरत्या विक्री व्हॅनमुळे ग्राहकांना आवश्यक वस्तू त्यांच्या परिसरात सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उत्पादन करणाऱ्या महिला, विक्री प्रक्रियेत सहभागी महिला आणि ग्राहक अशा तिन्ही घटकांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने ‘शक्ती ऑन व्हील्स’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0