शिरोळ तालुक्यात विविध शासकीय योजनांचा आढावा; मान्सून पूर्वतयारी व SIR मोहिमेवर भर
शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, उद्दिष्टपूर्तीचा तसेच मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत गृहनिर्माण, जलजीवन मिशन, उमेद अभियान, शिक्षण, महिला व बालविकास आणि विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या कामांवर चर्चा झाली.
कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव
जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ तालुक्यात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, उद्दिष्टपूर्तीचा तसेच मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय बैठक जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सरिता नांदेकर, शिक्षण व अर्थ सभापती शितल यादव, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे आणि उपसभापती मनिषा कदम उपस्थित होते.
बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण विभागांतर्गत रमाई आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, अटल आवास योजना, मोदी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत बचत गटांची स्थापना, बँक कर्ज वितरण, समुदाय गुंतवणूक निधी (CIF) आणि ‘लखपती दीदी’ उपक्रमाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.
शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना शिक्षक समायोजन, शाळा खोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती यावर भर देण्यात आला. समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधारणा योजना, स्वनिधी योजना आणि चालू आर्थिक वर्षातील नियोजन यांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली. तसेच संभाव्य पाणीटंचाई आणि शिरोळ तालुक्यातील पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून कुपोषित बालकांसाठी NRC आणि CCDC केंद्रांमार्फत उपचार, अंगणवाड्यांचे विद्युतीकरण, लेक लाडकी योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यांच्या अंमलबजावणीबाबत माहिती सादर करण्यात आली.
कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. तर पशुसंवर्धन विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, पशुधन लसीकरण मोहीम आणि इयर टॅगिंग कार्यक्रमाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.
यावेळी विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियान विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच १३ जुलै रोजी आयोजित ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश देण्यात आले.
प्रारंभी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी प्रास्ताविक केले, तर पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीस जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे खातेप्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0