मंत्री अदिती तटकरे यांची स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल लॅबला भेट; विद्यार्थ्यांच्या ॲप निर्मितीचे केले कौतुक
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबईतील दादर येथील स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण ॲप्लिकेशन्सची माहिती घेत डिजिटल शिक्षण, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकास उपक्रमांचे कौतुक केले.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मंत्री अदिती तटकरे यांची स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल लॅबला भेट; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण ॲप निर्मितीचे केले कौतुक
डिजिटल शिक्षण, शिष्यवृत्ती आणि जीवन कौशल्य विकास उपक्रमांची घेतली माहिती; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
मुंबई, दि. ३ नोव्हेंबर २०२६ : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या कौशल्यांना वाव मिळावा आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कार्यरत असलेल्या स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता उपक्रमाची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पाहणी केली. मुंबईतील दादर येथील भवानी शंकर सीबीएसई म्युनिसिपल पब्लिक स्कूलमधील फाउंडेशनच्या डिजिटल साक्षरता प्रयोगशाळेला त्यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेल्या ॲप्लिकेशन्सची माहिती घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे कौतुक केले.
या भेटीदरम्यान युवा नेते सुषांत जी. जबरे उपस्थित होते. मंत्री अदिती तटकरे यांनी डिजिटल प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अनुभवांची आणि तंत्रज्ञानविषयक प्रकल्पांची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांच्या ॲप निर्मितीचे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून कौतुक
डिजिटल लॅबमधील भेटीदरम्यान अदिती तटकरे यांनी अंश, नील आणि आरुष या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेली विविध ॲप्लिकेशन्स त्यांना सादर केली. या ॲप्लिकेशन्सची संकल्पना काय आहे, त्यांची निर्मिती कशी केली आणि त्यासाठी कोणत्या तांत्रिक प्रक्रियेचा वापर केला, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.
तसेच अक्षरा या विद्यार्थिनीशी तिच्या प्रकल्पाबाबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वरूप दिल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, सर्जनशीलता आणि शिकण्याची आवड यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
डिजिटल साक्षरता, शिष्यवृत्ती आणि जीवन कौशल्य विकासावर भर
स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापिका सिद्धी चौहान जयस्वाल आणि फाउंडेशनच्या सीएसआर व नियोजन विभागाच्या प्रमुख मधुमिता प्रसाद यांनी मंत्री अदिती तटकरे यांना संस्थेचे ध्येय, उद्दिष्टे आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
फाउंडेशनतर्फे प्रामुख्याने डिजिटल साक्षरता, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि जीवन कौशल्य विकास या तीन क्षेत्रांमध्ये काम केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डिजिटल साक्षरता उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र संगणक उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष संगणक प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना दर आठवड्याला प्रत्येकी एक तासाची दोन प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. सध्या मुंबईतील १४ शाळा आणि ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या एका शाळेसह एकूण १५ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पालघरमधील विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण
फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आली. यामध्ये पालघर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या जीवन कौशल्य विकास उपक्रमाची माहिती विशेषत्वाने मांडण्यात आली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्ये, आर्थिक साक्षरता, दैनंदिन व्यवहारांसाठी आवश्यक इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि करिअरविषयक तयारीचे प्रशिक्षण दिले जाते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि व्यावहारिक ज्ञान विकसित करण्यावर या उपक्रमात भर दिला जातो.
शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ
फाउंडेशनच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती उपक्रमाची माहितीही यावेळी देण्यात आली. आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी संस्थेकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत केली जाते.
या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथाही सादर करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रीय जलतरण स्पर्धेच्या तयारीत असलेल्या दृष्टिहीन जलतरणपटू सिद्धी दळवी हिच्या प्रेरणादायी प्रवासाची विशेष दखल घेण्यात आली.
मुंबईसह आदिवासी व दुर्गम भागांमध्ये उपक्रम विस्तारण्याचे नियोजन
स्नेह आशा फाउंडेशनच्या भविष्यातील योजनांची माहितीही मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पालघर, गडचिरोली आणि नंदुरबार या भागांमध्ये बालपणातील संगोपन व शिक्षण (Early Childhood Care and Education – ECCE) या क्षेत्रात उपक्रमांचा विस्तार करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.
लहान वयातच मुलांना दर्जेदार शिक्षण, योग्य शैक्षणिक वातावरण आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा आनंद – अदिती तटकरे
स्नेह आशा फाउंडेशनच्या उपक्रमांबाबत आपला अभिप्राय व्यक्त करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “आज स्नेहआशाने उभारलेल्या संगणक प्रयोगशाळेला भेट देऊन अतिशय आनंद झाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आणि त्यांचा उत्साह अनुभवण्याची संधी मिळाली. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
या भेटीतून फाउंडेशनच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण पाहण्याची संधीही मिळाली.
वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि कौशल्य विकासाची संधी
सिद्धी जैस्वाल आणि स्नेहा जैस्वाल यांनी स्थापन केलेली स्नेह आशा फाउंडेशन ही मुंबईस्थित ना-नफा तत्त्वावर कार्य करणारी संस्था आहे. डिजिटल शिक्षण, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून वंचित घटकांतील मुलांसाठी शिक्षणाच्या संधींचा विस्तार करण्याचे काम संस्था करत आहे.
तंत्रज्ञान शिक्षण, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, जीवन कौशल्ये आणि शैक्षणिक प्रगती यांचा समन्वय साधणारे फाउंडेशनचे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.