दक्षिण परिमंडळ-२ पोलिसांची मोठी कामगिरी; ७३.१८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
मुंबई पोलिसांच्या दक्षिण परिमंडळ-२ अंतर्गत विविध पोलीस ठाणे आणि सायबर पथकाने विशेष मोहिम राबवून चोरीस गेलेले ३१७ मोबाईल फोन तसेच रोख रक्कम, सोने आणि चांदीसह एकूण ७३.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल शोधून मूळ मालकांना परत केला.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. १६ : मुंबई पोलिसांच्या दक्षिण परिमंडळ-२ अंतर्गत विविध पोलीस ठाणे आणि सायबर पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत चोरीस गेलेले मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान मुद्देमाल शोधून एकूण ७३ लाख १७ हजार ८०३ रुपयांचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.
दक्षिण परिमंडळ-२ अंतर्गत एल.टी. मार्ग, पायधुनी, व्ही.पी. मार्ग, डॉ. डी.बी. मार्ग, गावदेवी, मालबार हिल पोलीस ठाणे तसेच दक्षिण परिमंडळ-२ सायबर पथकाने संयुक्तपणे ही विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान मुंबई, महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतून चोरीस गेलेले ३१७ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. या मोबाईल फोनची अंदाजे किंमत ४७ लाख ५५ हजार रुपये आहे.
याशिवाय एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला खालील मुद्देमालही मूळ मालकांना परत करण्यात आला.
रोख रक्कम : ₹५,००,०००
चांदी : १ किलो १०७ ग्रॅम (अंदाजे किंमत ₹२,६०,०३४)
सोने : ११७ ग्रॅम (तीन सोन्याच्या चेन – अंदाजे किंमत ₹१६,७९,७६९)
सोने : ९ ग्रॅम (सोन्याची चेन – अंदाजे किंमत ₹१,२३,०००)
या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ₹७३,१७,८०३ असून, विशेष कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आला.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा (कायदा व सुव्यवस्था) आणि अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (दक्षिण प्रादेशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस उपआयुक्त रागसुधा आर. (दक्षिण परिमंडळ-२) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, गिरगाव, गावदेवी व पायधुनी विभागातील अधिकारी, एल.टी. मार्ग, पायधुनी, व्ही.पी. मार्ग, डॉ. डी.बी. मार्ग, गावदेवी, मालबार हिल पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच दक्षिण परिमंडळ-२ सायबर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली.
विशेष मोहिमेमुळे चोरीला गेलेला मौल्यवान मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले असून, गुन्हे उघडकीस आणण्यात आणि नागरिकांचा विश्वास दृढ करण्यात दक्षिण परिमंडळ-२ पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0