एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता; पर्यावरण दिनानिमित्त राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते परळ बसस्थानक येथे एसटी महामंडळाच्या राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता केली जाणार असून प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

Jun 5, 2026 - 19:07
 0  2
एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता; पर्यावरण दिनानिमित्त राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
एसटी महामंडळ, प्रताप सरनाईक, स्वच्छता मोहीम,

प्रतिनिधी | मुंबई 

राज्यभरातील एसटी स्थानके आणि बसेसची दर चार तासांनी स्वच्छता; प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

मुंबई, दि. ५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यातील बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रवासी-अनुकूल बनविण्याचा निर्धार महामंडळाने व्यक्त केला आहे.

परळ बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि परिसर अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्याने नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार असून एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीच्या सेवांचा लाभ घेतात. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे.

प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर

पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेदरम्यान प्रत्येक बसस्थानकावर आढळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या संकलित करून त्यांचे पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) वर्गीकरण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून विविध टिकाऊ आणि उपयुक्त उत्पादने तयार करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

स्वच्छतेवर नियमित देखरेख

स्वच्छता ही एकदिवसीय मोहीम नसून सातत्याने राबविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगत सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मोहिमेच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक बसस्थानकावरील स्वच्छता व्यवस्थेचे नियोजनबद्ध निरीक्षण करण्यात येणार असून प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.

ई-बसेससाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने राज्यातील सर्व 251 आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. याच अनुषंगाने परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय नियंत्रक, कर्मचारी प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर परिवहन मंत्र्यांनी परळ बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या राज्यव्यापी मोहिमेमुळे एसटीच्या स्वच्छता व्यवस्थेत गुणात्मक सुधारणा होण्यासोबतच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0