विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे : मंत्री आदिती तटकरे

बदलत्या काळातील स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपन आवश्यक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईतील कार्यक्रमात सांगितले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे : मंत्री आदिती तटकरे
आदिती तटकरे, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, शैक्षणिक गुणवत्ता, महिला व बालविकास विभाग, अंजुमन-ए-इस्लाम, सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल, वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन, यामा पटेल फाउंडेशन, मुंबई, रेशन किट वाटप, महिला समुपदेशन केंद्र, भांडूप पोलीस स्टेशन

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई, दि. ३१ : बदलत्या काळातील वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. यश आणि अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

अंजुमन-ए-इस्लाम संचलित सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) इंडिया आणि यामा पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गरजू पालकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

शिक्षणासोबत मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यावे

आदिती तटकरे म्हणाल्या की, अंजुमन-ए-इस्लाम शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करत आहे. सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात येणाऱ्या पिढीला योग्य शिक्षण देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर भर न देता विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्यही बळकट करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांवर शिक्षण, स्पर्धा आणि अपेक्षांचा वाढता ताण असताना यशाबरोबरच अपयश स्वीकारण्याची मानसिकता त्यांच्यात निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी शासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

अंजुमन-ए-इस्लामच्या कार्याची माहिती

अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी यांनी संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती दिली. अंजुमन-ए-इस्लामची स्थापना १५२ वर्षांपूर्वी झाली असून स्वातंत्र्यसंग्रामातही संस्थेने योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या संदेशासोबत अंजुमन-ए-इस्लाम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बसाओ’ या संकल्पनेवर कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. अनाथ मुलींचे शिक्षण, विवाह आणि पुनर्वसनाची जबाबदारीही संस्था पार पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ईद-ए-मिलादनिमित्त गरजू कुटुंबांना मदत

ईद-ए-मिलादच्या पर्वानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाला लाभार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

मानवतेची सेवा आणि गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी, प्राचार्या अमीना काझी, वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हाजी हसीन आघाडी, यामा पटेल फाउंडेशन तसेच डब्ल्यूएमओ मुंबईचे शहर अध्यक्ष हाजी मुदस्सर पटेल, हाजी इम्तियाज मोटरवाला, नसीन मकलाई, हुरिया पटेल आणि मुमताज परफ्यूमवाला यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी भांडूपमध्ये समुपदेशन केंद्र

नोंदणीकृत सामाजिक संस्थांकडून पुढील दहा दिवसांत अर्ज मागविले

दरम्यान, महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील भांडूप पोलीस ठाण्यात महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी इच्छुक सामाजिक संस्थांनी पुढील दहा दिवसांत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

समुपदेशन केंद्रासाठी आवश्यक अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांचा विचार करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक संस्था तसेच महिला पदाधिकारी असलेल्या संस्थांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

तीन वर्षांचा समुपदेशन क्षेत्रातील अनुभव आवश्यक

समुपदेशन केंद्र चालविण्यासाठी संबंधित संस्थेला महिला समुपदेशन क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू उत्तीर्ण असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची यादी व संबंधित कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.

संस्थेची घटना व नियमावलीही सादर करावी लागणार असून, त्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविण्याचा उद्देश नमूद असणे आवश्यक आहे.

याशिवाय सनदी लेखापालांच्या स्वाक्षरीसह मागील तीन वर्षांचा अहवाल, मागील तीन महिन्यांचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट, कार्यरत पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते व दूरध्वनी क्रमांकाची यादी सादर करणे आवश्यक आहे.

संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नसल्याचे हमीपत्रही आवश्यक आहे. तसेच संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नसल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

यापूर्वी ज्या स्वयंसेवी संस्थांनी महिला समुपदेशन केंद्रासाठी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, चेंबूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.