त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या – पालकमंत्री गिरीश महाजन

श्रावण मास आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, शौचालये आणि वाहनतळांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या – पालकमंत्री गिरीश महाजन
त्र्यंबकेश्वर भाविक सुरक्षा, गिरीश महाजन, त्र्यंबकेश्वर श्रावण सोमवार, नाशिक कुंभमेळा,

नाशिक ब्यूरो :

नाशिक : श्रावण मास आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच त्यांना आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री महाजन बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गिते, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, अपर पोलीस अधीक्षक विमला, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर आरोग्य पथके तैनात करा

श्रावण सोमवारच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे या मार्गावर आवश्यक ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात यावीत. स्वच्छतागृहे व शौचालयांची पुरेशी व्यवस्था करावी तसेच भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या.

गंगाद्वार येथे रुग्णवाहिका आणि आरोग्य पथक उपलब्ध राहील, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वाहनतळांच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृहे तसेच आरोग्य पथकांची व्यवस्था करावी. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता त्र्यंबकेश्वर शहरातील दैनंदिन स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या श्रावणी सोमवारी झालेल्या गर्दीची प्रशासनाकडून दखल

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. सर्व विभाग एकमेकांच्या संपर्कात असून समन्वयाने काम सुरू आहे. त्यामुळे पहिल्या श्रावणी सोमवारी झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

श्रावण महिना संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरातील जुने रुग्णालय सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पाच हजार भाविकांच्या क्षमतेचा मंडप

त्र्यंबकेश्वर तालुका प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुमारे पाच हजार भाविकांची क्षमता असलेला मंडप उभारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली. यावेळी आमदार सरोज अहिरे आणि नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनीही प्रशासनास विविध सूचना केल्या.

कुंभमेळ्याची ‘रंगीत तालीम’ म्हणून श्रावणातील नियोजन

पत्रकार परिषदेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबतही माहिती दिली. यंदाच्या श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेले नियोजन हे आगामी कुंभमेळ्याची एकप्रकारे ‘रंगीत तालीम’ असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आगामी कुंभमेळ्यात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद

भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर येथील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. सर्वसामान्य भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शंभर खाटांचे रुग्णालय; एअर अॅम्बुलन्सचीही व्यवस्था

भाविकांच्या आरोग्य सुविधांबाबत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर येथे शंभर खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले असून आवश्यक त्या रुग्णवाहिका तसेच एअर अॅम्बुलन्सचीही व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नाही

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामे पारदर्शक पद्धतीने सुरू असून कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे महाजन यांनी सांगितले. कामांची तपासणी तीन वेगवेगळ्या यंत्रणांकडून केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कामाच्या दर्जाबाबत नागरिकांना कोणतीही कमतरता जाणवत असल्यास त्यांनी प्रशासनाकडे सूचना कराव्यात. अशा सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

‘विकासकामे आधी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बोला’

कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना महाजन यांनी विकासकामे आधी पूर्ण होऊ द्यावीत आणि त्यानंतर त्याबाबत बोलावे, असा टोला लगावला. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली कामे मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

धोकादायक वृक्ष हटविण्याची गरज

कुंभमेळा सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी विविध स्तरांवर कामे सुरू आहेत. रस्त्यालगत असलेले धोकादायक वृक्ष अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे आवश्यक ठिकाणी धोकादायक वृक्ष हटविणे गरजेचे असल्याचे महाजन यांनी सांगितले. त्याऐवजी शासनाकडून एका झाडामागे शंभर झाडे लावण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑक्टोबरमधील ध्वजारोहणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना निमंत्रण

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि आपण पंतप्रधान तसेच राष्ट्रपती यांना निमंत्रण देणार असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.

साधू-महंतांच्या तक्रारींची दखल घेणार

कुंभमेळ्याच्या कामांबाबत साधू-महंतांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेतली जात असल्याचे महाजन यांनी सांगितले. मात्र, कामे पूर्ण होण्यापूर्वी अनाठायी आरोप न करता काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नाशिकला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा प्रयत्न

कुंभमेळ्याचा लाभ केवळ कुंभमेळ्याच्या कालावधीपुरता मर्यादित न राहता त्यानंतरही नाशिकच्या विकासाला मिळणार आहे. नाशिक शहराचा सर्वांगीण विकास करून ते देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.

कुंभमेळ्याच्या विकासकामांचे कंत्राट केवळ गुजरात किंवा गुजराती लोकांना देण्यात आले असल्याचा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रावण महिन्यातील गर्दीचा अनुभव आणि त्यातून मिळालेल्या सूचनांच्या आधारे आगामी कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने अधिक सक्षम नियोजन करण्यास सुरुवात केली असून, भाविकांची सुरक्षितता, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.