त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी तिकिटांचा काळाबाजार; देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त अटकेत
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला पोलिसांनी अटक केली.
नाशिक ब्यूरो :
नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला पोलिसांनी अटक केली आहे.
भाविकांकडून दर्शनासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये घेत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी त्याच्या पुतण्यासह काही जणांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे पुरुषोत्तम कडलग यालाही मध्यरात्री अटक करण्यात आली.
या घटनेमुळे मंदिर व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भाविकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना, "कडलग हा शरद पवार यांच्या पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असून अशा प्रकारांमुळे देवस्थानांमध्येही भ्रष्टाचार वाढत आहे," अशी टीका केली.
या प्रकरणामुळे धार्मिक स्थळांवरील पारदर्शकता आणि व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
0