घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघड; सराईत चोरट्याला विनोबा भावे नगर पोलिसांकडून अटक
घाटकोपरमधील एचडीआयएल इमारतीतील घरफोडी प्रकरणाचा विनोबा भावे नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत सराईत आरोपीला अटक केली. सुमारे ४ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.
संतोष पांडे : प्रतिनिधी
घाटकोपर येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एचडीआयएल इमारत क्रमांक २०, बी विंग येथील एका घराचे कुलूप व कडी तोडून घरात प्रवेश करत दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या सराईत घरफोड्याला विनोबा भावे नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत शिताफीने अटक केली आहे.
या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमर चेडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान घटनास्थळी इन्व्हेस्टिगेशन व्हॅन तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तेथील सर्व महत्त्वाचे भौतिक पुरावे ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील तब्बल ४८ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या बारकाईने केलेल्या पाहणीत काही संशयित व्यक्ती आढळून आल्या.
दरम्यान, घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या बोटांच्या ठशांचा अहवाल प्राप्त झाला असता, हे ठसे अरबाझअली मोसिनअली मलिक (वय ३० वर्षे) याच्याशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची एम.ओ.बी.मधील माहिती मागवून त्याचा फोटो आणि पत्त्याची खातरजमा केली.
गोपनीय माहितीदारामार्फत आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेतला. अखेर बेहरामपाडा, बांद्रा परिसरातून आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने चोरीतील दागिने एका महिलेला विकल्याची कबुली दिली आहे. संबंधित महिला आरोपीचा शोध सध्या सुरू असून, चोरीतील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
तसेच, चोरीच्या पैशातून आरोपीने खरेदी केलेली एनएस २०० मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. तपासादरम्यान आरोपीनेच विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अंतर्गत दाखल घरफोडीचा गुन्हा केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडीचे एकूण चार गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे आरोपी हा सराईत घरफोड्या असल्याचे तपासात समोर आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित ताड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास विनोबा भावे नगर पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0