प्रत्येक व्यावसायिक वाहन चालकाला व्यवहारिक मराठी येणे आवश्यक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी भाषा अवगत असणे आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी रिक्षा व टॅक्सी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Apr 28, 2026 - 00:11
 0  10
प्रत्येक व्यावसायिक वाहन चालकाला व्यवहारिक मराठी येणे आवश्यक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक, व्यवहारिक मराठी, रिक्षाचालक मराठी

महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी भाषा अवगत असणे आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी रिक्षा व टॅक्सी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Description:
मुंबई : महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी भाषा येणे आवश्यक असून याबाबत राज्य शासन ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख तसेच विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून रोजगारनिर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा, यासाठी अमराठी चालकांनी मराठी शिकणे आवश्यक आहे.

प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद तसेच साहित्यिकांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही चालकांना मराठी शिकवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी, ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. मात्र मराठी भाषा शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मंगळवारी परिवहन आयुक्तालयात राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेच्या व्यवहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार जनजागृती मोहीम राबवून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी अवगत असणे अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0