जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य क्रीडा रॅली; १६७ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त कालिका मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फौंडेशन आणि डी.एस.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये भव्य क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ऑलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली असून १६७ खेळाडूंनी या रॅलीत सहभाग घेतला.

Jun 23, 2026 - 20:20
 0  5
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य क्रीडा रॅली; १६७ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
जागतिक ऑलिम्पिक दिन, नाशिक क्रीडा रॅली, दत्तू भोकनळ, रवींद्र नाईक, कालिका मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फौंडेशन,

नाशिक ब्यूरो, दि. २३ जून : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले. कालिका मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फौंडेशन आणि डी.एस.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून यंदाही तो मोठ्या उत्साहात पार पडला.

सालाबादप्रमाणे यंदा काळाराम मंदिर ते कालिका मंदिर संस्थान या मार्गावर क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात काळाराम मंदिर परिसरातून झाली. यावेळी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ तसेच क्रीडा मंत्र्यांचे माजी ओएसडी व माजी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

रॅलीमध्ये १६७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना दत्तू भोकनळ आणि रवींद्र नाईक यांनी ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व विशद केले. नाशिकमधून अधिकाधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तसेच भविष्यात ऑलिम्पियन घडावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या उपक्रमात क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, उदय खरे, अविनाश ढोली, मॉडर्न पेंथॉथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष निहार शहा, दीपक निकम, चिन्मय देशपांडे, अश्वमेध अकादमीचे संचालक मनीष बोरस्ते, कबड्डी प्रशिक्षक शरद पाटील, नवजीवन स्कूलचे भूषण सोननिस, तन्मय कर्णिक, कुणाल अहिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

काळाराम मंदिर, पंचवटी कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, रविवार कारंजा, टिळक रोड, यशवंत व्यायाम शाळा, मेहेर सिग्नल, सीबीएस मोडक सर्कल, गडकरी चौक आणि कालिका मंदिर असा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. कालिका मंदिर येथे संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील आणि यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी खेळाडूंचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले.

आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडूंना अल्पोपहाराचेही वितरण करण्यात आले.

३० जूनपर्यंत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत ३० जूनपर्यंत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तलवारबाजी, कॅरम, फूटसाल, सेपक टकरा, जंपरोप, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचा समावेश आहे.

तसेच २६ जून रोजी पेठ रोड येथील चामर लेणी परिसरात बीज उधळण आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ ३० जून रोजी कालिका मंदिर संस्थानच्या सभागृहात होणार असल्याची माहिती क्रीडा संघटक अशोक दुधारे यांनी दिली.

दरम्यान, या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभाग आणि वाहतूक पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीमुळे रॅलीचे नियोजन सुरळीतपणे पार पडल्याचे आयोजकांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0