तळागाळातील नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा; वरळीतील 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला' उत्स्फूर्त प्रतिसाद – सचिन अहिर

मुंबईतील वरळी येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचे आवाहन विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केले.

Jul 28, 2026 - 21:22
 0  6
तळागाळातील नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा; वरळीतील 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला' उत्स्फूर्त प्रतिसाद – सचिन अहिर
सचिन अहिर, महसूल समाधान शिबिर, वरळी, मुंबई,

प्रतिनिधीदेवानंद शिंदे 

मुंबई, दि. 28 : "तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे," असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाअंतर्गत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हाजी अली येथील लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिन अहिर म्हणाले की, "राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे," ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली होती. त्याच संकल्पनेतून राज्य शासनाने सुरू केलेल्या या अभियानामुळे 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. ही शिबिरे केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता गरजेनुसार सातत्याने आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना आणि इतर सामाजिक कल्याणकारी योजनांची अधिक व्यापक जनजागृती करण्यावर भर देत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, कोकण विभागात मोठ्या प्रमाणावर महसूल समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून नागरिकांना रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले, सात-बारा उतारे, प्रलंबित फेरफार नोंदी, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या विविध शासकीय सेवांचा लाभ थेट त्यांच्या परिसरात मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत मुंबई शहरात सुमारे साडेसात लाख शासकीय सेवा नागरिकांना प्रदान करण्यात आल्या आहेत. शासनाने विविध सेवा ऑनलाइन केल्यामुळे दाखले, प्रवेश प्रक्रिया आणि इतर अनेक सुविधा नागरिकांना सहज उपलब्ध होत असून, डिजिटल सेवांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या अभियानात प्रशासनातील ३९ विविध विभागांनी सहभागी होत नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. शिबिरात वरळी मतदारसंघातील शेकडो लाभार्थींना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे, दाखले आणि लाभांचे वितरण उपसभापती सचिन अहिर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या समाधान शिबिरात नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तळागाळातील नागरिकांना शासनाच्या सेवा आणि योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.