‘पोलीस’ नामावलीच्या लाल पट्टीच्या वाहनांवर कारवाईचे आदेश; अनधिकृत वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पट्टी अथवा ‘पोलीस’ नामावलीचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Aug 4, 2026 - 21:50
 0  12
‘पोलीस’ नामावलीच्या लाल पट्टीच्या वाहनांवर कारवाईचे आदेश; अनधिकृत वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
पोलीस नामावली, लाल पट्टी वाहन, अनधिकृत पोलीस स्टिकर, महाराष्ट्र पोलीस, खासगी वाहन, मोटार वाहन नियम, वाहतूक पोलीस,

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यातील काही पोलीस अधिकारी आणि अंमलदार आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पट्टी अथवा ‘पोलीस’ नामावलीचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. काही पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पट्टी अथवा ‘पोलीस’ असा उल्लेख करत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाची दखल घेत संबंधित वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

यापूर्वी उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ‘पोलीस’ अशी लाल पट्टी असलेली अथवा ‘पोलीस’ नामावली असलेली वाहने अद्यापही काही ठिकाणी आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांनी आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पट्टी अथवा ‘पोलीस’ नामावलीचा वापर करणे नियमबाह्य असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारचा अनधिकृत वापर वाहनांबाबत गैरसमज निर्माण करू शकतो तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन ठरू शकतो.

सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना आदेश देण्यात आले आहेत की, त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नामावली अथवा लाल रंगाची पट्टी लावलेली असल्यास ती तातडीने काढून टाकावी. यापुढे अशा प्रकारची वाहने आढळल्यास संबंधित वाहनधारकांविरुद्ध महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

आदेशानुसार, ‘पोलीस’ पट्टी अथवा ‘पोलीस’ शब्द लिहिलेली वाहने आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलीस विभागाला या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबवून अशा वाहनांची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशामुळे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नामावली किंवा लाल पट्टीचा अनधिकृत वापर रोखण्यास मदत होणार असून, वाहनांवरील अधिकृत आणि अनधिकृत ओळखचिन्हांबाबत स्पष्टता निर्माण होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.