कोल्हापूरात अग्निवीर भरतीच्या तयारीला वेग; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

कोल्हापूर पोलीस परेड ग्राउंडवर 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील युवकांसाठी अग्निवीर भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या भरतीची तयारी आणि विविध विभागांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

Jun 22, 2026 - 22:25
 0  8
कोल्हापूरात अग्निवीर भरतीच्या तयारीला वेग; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
अग्निवीर भरती, अग्निवीर 2026, कोल्हापूर अग्निवीर भरती,

कोल्हापूर प्रतिनिधी:  उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. येत्या 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील युवकांसाठी अग्निवीर भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या भरती संदर्भात शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. भरती प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी संबंधित विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वतंत्र आदेश जारी केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या भोजन व अन्य मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. उमेदवारांना स्वच्छ व परवडणारे अन्न उपलब्ध व्हावे यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले.

यावेळी संचालक (ARO) कर्नल प्रशांतसिंग यांनी भरती प्रक्रियेसाठी महसूल, रोजगार, पोलीस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद केले. तसेच अग्निवीर भरती पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर होणार असल्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीस सुभेदार मेजर जसविंदर सिंग, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार स्वप्निल पवार, महानगरपालिका उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1