भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा अहवाल महिनाभरात सादर करा – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपश्चर्येची भूमी असलेल्या देहूजवळील भंडारा-भामचंद्र गड परिसराचा सर्वंकष अभ्यास करून महिनाभरात सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

Sep 4, 2026 - 23:11
 0  10
भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा अहवाल महिनाभरात सादर करा – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
भंडारा गड, भामचंद्र गड, आशिष शेलार, तुकाराम महाराज, देहू, राज्य संरक्षित स्मारक, संरक्षित क्षेत्र, अवैध उत्खनन,

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

मुंबई, दि. ४ (वृत्त क्र. ३३९९) : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ज्या भूमीत तपश्चर्या केली, त्या देहूजवळील भंडारा-भामचंद्र गड परिसराच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

भंडारा व भामचंद्र डोंगर परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावा, तसेच या परिसरात सातत्याने सुरू असलेले अवैध उत्खनन आणि बांधकामे कायमस्वरूपी थांबवावीत, अशी मागणी तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीने मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती. शासनाने २०११ मध्ये काढलेली राज्य संरक्षित स्मारकाबाबतची अधिसूचना तातडीने लागू करावी, अशीही मागणी समितीने केली.

या मागण्यांच्या अनुषंगाने पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांच्यासह समितीचे सदस्य, संबंधित जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पोलीस, एमआयडीसी तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

२०११ पासून अधिसूचनेची प्रक्रिया

बैठकीत पुरातत्व विभागाने भंडारा-भामचंद्र गड परिसराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रक्रियेची माहिती दिली. २०११ मध्ये राज्य संरक्षित स्मारकाबाबत अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्यानंतर २०१७ मध्ये त्यामध्ये काही बदल सुचवून प्रस्ताव विधि व न्याय विभागाने परत पाठविला होता.

त्यानुसार पुरातत्व विभागाने आवश्यक सुधारणा करून २०२५ मध्ये नवीन प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे सादर केला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

उत्खननाबाबत संयुक्त समिती

भंडारा-भामचंद्र गड परिसरातील उत्खननाच्या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. परिसरातील उत्खननाच्या प्रश्नावर संयुक्त समिती गठित करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

परिसराचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता त्याचे संरक्षण करताना अवैध उत्खनन आणि अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक

भंडारा-भामचंद्र गडाच्या संपूर्ण परिसराशी राज्य शासनाच्या विविध विभागांचा संबंध येत असल्याने कोणताही निर्णय घेताना सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणे आवश्यक असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्य सचिवांना सूचना देऊन सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधत परिसराच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करण्याचे निर्देश दिले. हा अभ्यास पूर्ण करून एका महिन्याच्या आत सद्यस्थिती अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

तसेच या संपूर्ण कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधावा, असे निर्देशही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

भंडारा-भामचंद्र गड हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपश्चर्येशी जोडलेला महत्त्वाचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा असल्याने या परिसराच्या संरक्षणासाठी शासनस्तरावर पुढील कार्यवाहीला वेग येण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.