भायखळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; ११८ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

मुंबईतील भायखळा येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ ११८ लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ देण्यात आला. ३२ शासकीय विभागांच्या सहभागातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

Jul 28, 2026 - 21:53
 0  9
भायखळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; ११८ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ
भायखळा, महसूल समाधान शिबिर, मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय,

प्रतिनिधी | देवानंद शिंदे 

मुंबई, दि. 28 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘गतिमान प्रशासन’ उपक्रमांतर्गत भायखळा विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये ११८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांअंतर्गत प्रमाणपत्रे, दाखले आणि सेवांचे वितरण करण्यात आले.

भायखळा येथील पेंग्विन इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहात आयोजित या शिबिराला भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संजय पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कंकाळ, स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर, नगरसेवक रोहिदास लोखंडे, शिबिर समन्वयक कमलेश डोके तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देत महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचे सांगितले. विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलना भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती घेण्याचे आणि त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

यावेळी आमदार मनोज जामसुतकर म्हणाले की, शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारा हा उपक्रम असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाच्या विचारांशी सुसंगत अशा या अभियानामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काच्या शासकीय सेवा अधिक सुलभपणे मिळत आहेत. अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या शिबिरात ३२ शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. विविध शासकीय योजना, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तक्रार निवारण आणि विविध सेवांबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध झाली.

शिबिरादरम्यान ११८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांअंतर्गत उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रमाणपत्रे, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग कल्याण योजना, उद्योग विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, मुंबई भूमापन विभागाच्या मिळकत पत्रिका व नकाशे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गंभीर आजार सहाय्यता योजनेचे धनादेश, शिधापत्रिका सेवा तसेच नोंदणीकृत पथविक्रेता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

या समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती, आवश्यक सेवा आणि लाभ नागरिकांना सुलभपणे उपलब्ध करून देत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.