विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – आयुक्त अश्विनी भिडे

मुंबई शहर व उपनगरातील मतदार यादीसाठी राबविण्यात येणारा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. विविध पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बीएमसी मुख्यालयात बैठक पार पडली.

Apr 24, 2026 - 22:39
 0  7
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – आयुक्त अश्विनी भिडे
अश्विनी भिडे, BMC News

मुंबई प्रतिनिधी 

दि. २४ एप्रिल २०२६ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन - SIR) कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, विविध गटनेते आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, डॉ. अश्विनी जोशी, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, सहआयुक्त विश्वास शंकरवार आदी अधिकारी उपस्थित होते.

२४ वर्षांनंतर सखोल पुनरिक्षण

अश्विनी भिडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात यापूर्वी सन २००२ मध्ये, म्हणजे जवळपास २४ वर्षांपूर्वी विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात आले होते. स्थलांतर, दुबार नोंदणी, मृत मतदारांची नावे किंवा परदेशी नागरिकांची बेकायदेशीर नोंदणी अशा कारणांमुळे मतदार यादीत सुधारणा आवश्यक ठरते.

त्यामुळे महाराष्ट्रातील इतर भागांसह बृहन्मुंबई क्षेत्रातही हा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सहा टप्प्यांत होणार प्रक्रिया

हा कार्यक्रम खालील सहा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे:

पुनरिक्षण पूर्व कालावधी

गणना (Enumeration) कालावधी

AASD यादी तयार करणे

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे

दावे व हरकती स्वीकारणे

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मतदार मॅपिंगचे काम सुरू असून, २००२ च्या मतदार यादीतील नावे २०२४ च्या यादीशी जुळवून BLO ॲपमध्ये नोंद केली जात आहे.

BLA नेमणुकीचे आवाहन

महानगरपालिकेने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त केले आहेत. पुनरिक्षण प्रक्रिया अधिक पारदर्शक, प्रभावी आणि जलद पूर्ण व्हावी यासाठी राजकीय पक्षांनी स्थानिक स्तरावर मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (BLA) नेमावेत, असे आवाहनही आयुक्त भिडे यांनी केले.

मुंबईतील मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0