जनगणना २०२७ साठी स्वगणनेचे आवाहन; १५ मेपर्यंत माहिती भरा – मंत्री दादाजी भुसे
भारताच्या १६व्या डिजिटल जनगणना २०२७ अंतर्गत नागरिकांना १५ मे २०२६ पर्यंत स्वगणना करण्याचे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. त्यानंतर घरगणना प्रक्रिया प्रत्यक्ष भेटीद्वारे पार पडणार आहे.
नाशिक ब्यूरो :
भारत सरकारने जाहीर केलेल्या १६व्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत यंदाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून नागरिकांनी स्वगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे.
या जनगणनेत दोन प्रमुख टप्पे असणार आहेत. पहिला टप्पा म्हणजे ‘घरयादी व घरगणना’, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष पडताळणीचा असेल.
१) स्वगणना प्रक्रिया (Self Enumeration)
दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती भरायची आहे.
मोबाईल क्रमांकाद्वारे OTP वापरून लॉगिन करून कुटुंबाची माहिती नोंदवावी लागेल. यामध्ये घराचे लोकेशन डिजिटल नकाशावर चिन्हांकित करून आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट करावी लागेल. त्यानंतर नागरिकांना १२ अंकी SE ID प्राप्त होईल. ही ID पुढील पडताळणीसाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
२) घरगणना व पडताळणी प्रक्रिया
दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत महानगरपालिकेचे नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देऊन नागरिकांची माहिती मोबाईल अॅपच्या माध्यमातून नोंदवतील आणि पडताळणी करतील.
मंत्री दादाजी भुसे यांनी स्वतः स्वगणना करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी सांगितले की, जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी होणे आवश्यक आहे.
स्वगणना केली नसेल तरीही प्रगणक घरी येऊन प्रक्रिया पूर्ण करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रगणक कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक तपशील मागणार नाहीत.
नागरिकांची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाणार असून ती केवळ देशाच्या विकास योजनांसाठी वापरण्यात येणार आहे.
दरम्यान, महापौर नसरीन खालिद शेख आणि आयुक्त रविंद्र जाधव यांनीही नागरिकांना स्वगणना पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी महत्त्वाची प्रक्रिया असल्याने सर्व नागरिकांनी यात सहभाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

