चिंचवड स्टेशन परिसरात घरगणना मोहिमेस सुरुवात; नागरिकांनी अचूक माहिती देण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड शहरात जनगणना २०२६-२७ अंतर्गत घर यादी आणि घरगणना मोहिमेस सुरुवात झाली असून १४ जूनपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी घरोघरी भेट देणाऱ्या प्रगणकांना अचूक आणि संपूर्ण माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

May 18, 2026 - 19:20
 0  7
चिंचवड स्टेशन परिसरात घरगणना मोहिमेस सुरुवात; नागरिकांनी अचूक माहिती देण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड जनगणना, घरगणना मोहीम, चिंचवड स्टेशन

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १८ :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रांतर्गत आगामी जनगणना २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर घर यादी आणि घरगणना मोहिमेस शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम १४ जूनपर्यंत सुरू राहणार असून महापालिकेचे कर्मचारी, पर्यवेक्षक आणि प्रगणक घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत.

महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवि लांडगे आणि उपायुक्त सचिन पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रगणकांना अचूक आणि योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.

महापालिकेकडून या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक १९ मध्ये पर्यवेक्षक म्हणून प्रवीण माळी तर प्रगणक म्हणून बाळू महाजन, दत्तात्रय वाघ, जुबेर अली मुजाफ्फर, राहुल मोरे आणि काजल खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरभरात सुमारे सहा हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक कार्यरत असून प्रत्येक प्रगणकाकडे सुमारे २०० घरांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संकलित होणारी माहिती मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदविण्यात येत आहे. ओळखपत्र असलेले प्रगणक घरी भेट देत असताना नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया असून अचूक माहितीच्या आधारे शासनाला विकासाचे नियोजन प्रभावीपणे करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ही आपली जबाबदारी समजून प्रामाणिक आणि अचूक माहिती देत या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले की, जनगणनेसाठी संकलित केली जाणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राखली जाणार असून ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाईल. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने आणि निसंकोचपणे योग्य माहिती द्यावी.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0