दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत; महाराष्ट्राच्या स्टार्टअप परिसंस्थेवर सविस्तर चर्चा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था, नवोपक्रम आणि उद्योजकतेचा नवा वेग’ या विषयावर आधारित या मुलाखतीत राज्यातील स्टार्टअप संस्कृती, एआय, डीप टेक, अॅग्रीटेक, महिला उद्योजकता, ग्रामीण स्टार्टअप्स आणि शासनाच्या स्टार्टअप धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था, नवोपक्रम आणि उद्योजकतेचा नवा वेग’ या विषयावर आधारित या विशेष मुलाखतीत राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमची वाटचाल, नव्या संधी आणि शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
ही मुलाखत १२ ते १६ मे २०२६ दरम्यान दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसी २०२४-२९ अंतर्गत राज्यात निर्माण होत असलेल्या नवोपक्रमशील वातावरणाचा आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीप टेक, क्लायमेट टेक, ईव्ही आणि अॅग्रीटेक यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांसाठी उपलब्ध होत असलेल्या संधींबाबत डॉ. पाटील यांनी माहिती दिली.
ग्रामीण भागात स्टार्टअप संस्कृती रुजविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, महिला आणि युवा उद्योजकांसाठीच्या विशेष योजना तसेच कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीमध्ये स्टार्टअप्सची भूमिका यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
स्टार्टअप्सना कल्पनेपासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास करताना येणारी आव्हाने, ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ अंतर्गत मिळणारे प्रोत्साहन, नियामक सहाय्य, जागतिक बाजारपेठेतील संधी तसेच कॉर्पोरेट आणि स्टार्टअप्स यांच्यातील सहयोगाचे महत्त्व याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे स्टार्टअप हब बनविण्यासाठी शासनाने आखलेला रोडमॅप, ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्सना दिले जाणारे प्राधान्य तसेच आगामी काळातील धोरणात्मक बदल याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती या मुलाखतीतून श्रोत्यांना मिळणार आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0