शासनाच्या ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आंचल गोयल
मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना शासनाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रभादेवी येथे आयोजित शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे आणि योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.
मुंबई : शासनाच्या विविध ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊन नागरिकांनी वेळ आणि पैशांची बचत करावी, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत आयोजित शेवटच्या शिबिरात त्या बोलत होत्या.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा उपलब्ध करून दिल्या.
जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, महाराजस्व अभियान हा केवळ शिबिरापुरता मर्यादित नसून सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. शिबिर संपल्यानंतरही दाखले वितरण आणि इतर सेवा नियमितपणे सुरू राहतील.
त्या पुढे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर अनेक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध आहेत. विशेषतः तरुण पिढीने ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वापर करून विविध सेवांचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यास प्रशासनाकडून निश्चित कालमर्यादेत प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे ही कायदेशीर जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांच्या मॅपिंगबाबतही त्यांनी नागरिकांना आवाहन केले. घराघरात जाऊन काम करणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे, २००२ च्या मतदार यादीतील स्वतःची नोंद शोधून तयार ठेवावी आणि ‘वोटर सर्विस पोर्टल’चा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांच्या स्टॉलवरून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय योजनांची माहिती आणि विविध लाभ देण्यात आले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश सांगळे, प्रशांत पानवेकर, महेश हरिश्चंद्रे, तहसीलदार राजेश वैष्णव, संकेत यमगर आदी उपस्थित होते.
नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी सुमारे २८ विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. जवळपास ४५० नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली. यापैकी ६७ नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला तर १२२ नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. एकूण सुमारे ६५० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0