महागणेशोत्सव : कोल्हापुरात २३ ऑगस्टला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 18, 2026 - 16:36
Aug 22, 2026 - 18:31
 0  5
महागणेशोत्सव : कोल्हापुरात २३ ऑगस्टला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
महागणेशोत्सव, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, गणेशमूर्ती कार्यशाळा, कोल्हापूर, २३ ऑगस्ट कार्यशाळा,

प्रतिनिधी :  उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. १८ ऑगस्ट २०२६ (जिमाका) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. यंदा राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरातील विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्साहाने आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो. अशा मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, त्यांच्या विधायक उपक्रमांची शासनाकडून दखल घेतली जाणार आहे. उत्कृष्ट उपक्रमांना बक्षिसांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची संधी

गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून ती महाराष्ट्राची कला, परंपरा आणि सर्जनशीलतेशी जोडलेली सांस्कृतिक ओळख आहे. सध्याच्या काळात पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता नागरिकांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारावी, या उद्देशाने विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून २३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कोल्हापुरात भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात आयोजन

कोल्हापूर केंद्रावरील कार्यशाळा २३ ऑगस्ट रोजी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत नागरिकांना स्वतःच्या हातांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा अनुभव घेता येणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून जागा मर्यादित आहेत. प्रवेश शुल्क ३०० रुपये ठेवण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक शाडूची माती आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

डिजिटल युगातील पिढीला मातीशी जोडण्याचा प्रयत्न

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि स्क्रीनच्या जगात व्यस्त असलेल्या हातांना पुन्हा मातीचा प्रत्यक्ष स्पर्श अनुभवता यावा आणि आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचा आनंद मिळावा, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.

विशेषतः तरुण पिढीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्वतः गणेशमूर्ती तयार करताना नागरिकांना कलात्मक अभिव्यक्तीची संधी मिळण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचणार आहे.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे

पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि कलाप्रेमींनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील कार्यशाळेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी स्थानिक समन्वयक प्रशांत जोशी – ७७२००८८८१४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यशाळेची महत्त्वाची माहिती

कार्यशाळा : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

दिनांक : २३ ऑगस्ट २०२६

स्थळ : भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर

प्रवेश शुल्क : ३०० रुपये

साहित्य : शाडूची माती व आवश्यक साहित्य उपलब्ध

प्रमाणपत्र : सहभागी सर्वांना सहभाग प्रमाणपत्र

नोंदणी : पूर्वनोंदणी आवश्यक; जागा मर्यादित

संपर्क : प्रशांत जोशी – ७७२००८८८१४

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून ‘मातीशी नाते आणि पर्यावरणाशी बांधिलकी’ हा संदेश जनमानसात पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.