महागणेशोत्सव : कोल्हापुरात २३ ऑगस्टला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पुढाकाराने कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात २३ ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 21, 2026 - 01:29
 0  6
महागणेशोत्सव : कोल्हापुरात २३ ऑगस्टला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, गणेशमूर्ती कार्यशाळा, महागणेशोत्सव, कोल्हापूर, २३ ऑगस्ट कार्यशाळा

प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २० (जिमाका) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. यंदा राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रासोबतच देशभरात आणि जगभरातील विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विधायक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उपक्रमांची शासनाकडून दखल घेतली जाणार असून, उत्कृष्ट उपक्रमांना बक्षिसांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

कोल्हापुरात २३ ऑगस्टला कार्यशाळा

गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून महाराष्ट्राच्या कला, परंपरा आणि सर्जनशीलतेशी जोडलेली आहे. पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारावी, या उद्देशाने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि लातूर येथे कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सहभागासाठी नोंदणी आवश्यक

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून जागा मर्यादित आहेत. कार्यशाळेसाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

सहभागींना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

डिजिटल युगात मातीशी जोडणारा उपक्रम

मोबाईल, इंटरनेट आणि स्क्रीनच्या डिजिटल जगात व्यस्त असलेल्या नागरिकांना आणि विशेषतः तरुण पिढीला मातीशी जोडणे हा या कार्यशाळेचा महत्त्वाचा उद्देश आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचा आनंद नागरिकांना मिळावा आणि त्यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मातीचा प्रत्यक्ष अनुभव घेत मूर्ती घडविण्यामुळे नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्वही समजण्यास मदत होणार आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करताना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि कलाप्रेमींनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील कार्यशाळेसाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी स्थानिक समन्वयक प्रशांत जोशी – ७७२००८८८१४ यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धनासोबतच कला, संस्कृती आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.