गोकुळ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ऑक्टोबरला मतमोजणी

गोकुळ दूध संघाच्या २०२६-२०३१ संचालक मंडळ निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी. ३५ केंद्रांवर ५,४१८ मतदार; २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात.

गोकुळ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ऑक्टोबरला मतमोजणी
गोकुळ निवडणूक २०२६, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर निवडणूक, विजय राठोड, गोकुळ मतदान, ५४१८ मतदार, ३५ मतदान केंद्रे, १९ ऑक्टोबर मतमोजणी, कोल्हापूर जिल्हा बातम्या

प्रतिनिधी: उमेश जाधव 

३५ मतदान केंद्रांवर ५,४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; २५ संचालक पदांसाठी ५० उमेदवार रिंगणात

मतदान व मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीचे निर्देश

कोल्हापूर, दि. १३ ऑक्टोबर २०२६ (जिमाका) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमानुसार पार पाडावी. कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

या निवडणुकीत जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर एकूण ५ हजार ४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान आणि मतमोजणी शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

गोकुळ निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. गोकुळची निवडणूक महत्त्वाची असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. निवडणूक प्रक्रियेत कोणावरही आरोप होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मतदान १८ ऑक्टोबर रोजी होणार असून, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे मतमोजणी सुरू होणार आहे.

२५ जागांसाठी पाच स्वतंत्र मतपत्रिका

गोकुळच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी प्रवर्गनिहाय उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :

सर्वसाधारण मतदारसंघ: २० जागांसाठी ४० उमेदवार

महिला प्रतिनिधी: २ जागांसाठी ४ उमेदवार

इतर मागास प्रवर्ग: १ जागेसाठी २ उमेदवार

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग: १ जागेसाठी २ उमेदवार

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी: १ जागेसाठी २ उमेदवार

या निवडणुकीसाठी पाच स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका वापरण्यात येणार आहेत. सर्वसाधारण मतदारसंघासाठी पांढरी, महिला प्रतिनिधींसाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी फिकट हिरवी, विमुक्त जाती-भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्गासाठी फिकट पिवळी, तर अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधींसाठी फिकट निळी मतपत्रिका निश्चित करण्यात आली आहे.

पाच स्वतंत्र मतपत्रिकांमुळे मतदान प्रक्रिया काळजीपूर्वक आणि नियमांनुसार पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मतदान केंद्रांवर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाची निवडणूक जिल्ह्याच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, अशा प्रकारे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करावे. मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी आणि मतदानासाठी आलेले मतदार यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश देऊ नये. मतदारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मतदान प्रक्रियेसाठी ३५ केंद्राध्यक्ष, २१० मतदान अधिकारी आणि ३५ शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय एक राखीव केंद्राध्यक्ष, ३० राखीव मतदान अधिकारी आणि पाच राखीव शिपायांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे एकूण ३५ शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

निवडणुकीदरम्यान कोणतीही तक्रार किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्यावर नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय मतदान केंद्रे आणि मतदारसंख्या

जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील मतदान केंद्रे आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्र क्रमांक २९, राधानगरी येथे सर्वाधिक १८२ मतदार, तर मतदान केंद्र क्रमांक ३४, शिरोळ येथे सर्वांत कमी १२९ मतदार आहेत.

मतदान साहित्याचे १७ ऑक्टोबरला वाटप

मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्रांसाठी १२, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी १२ आणि पोलीस बंदोबस्तासाठी १२ वाहनांचा समावेश आहे. यासाठी १० टेंपो आणि २६ तवेरा वाहने वापरण्यात येणार असून, दोन बस संघाकडून पुरविण्यात येणार आहेत.

मतदान साहित्याचे वाटप आणि जमा करण्याची व्यवस्था शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा येथे करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सात टेबलांवरून मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

३२ टेबलांवर मतमोजणी

मतमोजणीसाठी एकूण ३२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ३२ मतमोजणी पर्यवेक्षक, ६४ मतमोजणी सहाय्यक आणि पाच शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच दोन राखीव पर्यवेक्षक, चार राखीव सहाय्यक आणि तीन राखीव शिपायांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्व मतदान केंद्रांवरील मतपत्रिका मतदारसंघनिहाय एकत्रित करून प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे स्वतंत्र गठ्ठे तयार करण्यात येणार आहेत. प्रवर्गनिहाय मतमोजणीचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे :

टेबल क्रमांक १ ते २२: सर्वसाधारण मतदारसंघ

टेबल क्रमांक २३ ते २६: महिला प्रतिनिधी

टेबल क्रमांक २७ व २८: इतर मागास प्रवर्ग

टेबल क्रमांक २९ व ३०: विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग

टेबल क्रमांक ३१ व ३२: अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी

मतदान आणि मतमोजणी केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश

निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या ९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

हे आदेश १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून १८ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्रांच्या ठिकाणी लागू राहतील. तसेच १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केंद्रावरही हे आदेश लागू असतील.

वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित

या बैठकीला पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख आणि प्रेमदास राठोड यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.