राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील जतन व संवर्धन कामाची पाहणी केली.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन
जिष्णू देव वर्मा, श्री अंबाबाई महालक्ष्मी, कोल्हापूर, अंबाबाई मंदिर, वेदोक्त संकल्प पूजा, महालक्ष्मी मंदिर,

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २९ : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज कोल्हापुरातील प्रसिद्ध श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी त्यांनी मातुर्लिंग श्री महादेव आणि श्री गणेशाचेही दर्शन घेऊन प्रार्थना केली.

श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात आगमन झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन राज्यपालांचे स्वागत केले.

दर्शन व पूजेनंतर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी अंबाबाई मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाची पाहणी केली. मंदिर परिसरातील सुरू असलेल्या कामाची सद्यस्थिती, कामाचे स्वरूप आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड तसेच धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी राज्यपालांना माहिती दिली.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्नील पवार, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे तसेच देवस्थानचे पुरोहित प्रमोद उपाध्ये आणि बाळासाहेब दादरणे आदी उपस्थित होते.

राज्यपालांच्या मंदिर भेटीदरम्यान देवस्थान समिती व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरातील सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामाचीही पाहणी झाली.