वाढदिवसानिमित्त आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांचा अवयवदानाचा संकल्प; नायर रुग्णालयात अधिकृत नोंदणी
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी वाढदिवसानिमित्त बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात अवयवदानासाठी अधिकृत नोंदणी करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला. नायर रुग्णालयाच्या इतिहासात आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी प्रथमच अवयवदानासाठी अर्ज केल्याची नोंद झाली आहे.
मुंबई | ब्यूरो: अनिल सावरे
वाढदिवस हा अनेकांसाठी आनंद, शुभेच्छा आणि उत्सवाचा दिवस असतो. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करत बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात अवयवदानासाठी अधिकृत नोंदणी केली. मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान देण्याचा संकल्प करत त्यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमामुळे नायर रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी अवयवदानासाठी अधिकृत अर्ज केल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना हरिष भांदिर्गे म्हणाले, "वाढदिवस हा केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे. माझ्यानंतर माझ्या अवयवांमुळे एखाद्याला नवजीवन मिळणार असेल, तर त्यापेक्षा मोठे भाग्य आणि समाधान दुसरे असू शकत नाही."
आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून अवयवदानाबाबत जनजागृती करणे ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. आज देशभरात हजारो रुग्ण हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत जीवनाशी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या अवयवदानातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा संदेश त्यांनी यावेळी दिला.
ते पुढे म्हणाले, "मृत्यूनंतर शरीर संपते, पण आपल्या अवयवांमधून अनेकांचे आयुष्य पुन्हा फुलू शकते. आपण या जगातून निघून गेल्यानंतरही आपल्या अस्तित्वाचा एक भाग कोणाच्या तरी श्वासात, हृदयाच्या ठोक्यात किंवा डोळ्यांतील प्रकाशात जिवंत राहू शकतो. यापेक्षा मोठे दान आणि मानवतेची सेवा दुसरी कोणतीही असू शकत नाही."
अवयवदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करून अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाढदिवसानिमित्त घेतलेला हा संकल्प केवळ वैयक्तिक निर्णय नसून समाजात अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शैलेंद्र मोहिते, रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, विविध विभागांचे डॉक्टर तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिष भांदिर्गे यांच्या या उपक्रमाचे विविध सामाजिक, वैद्यकीय आणि नागरिक संघटनांकडून स्वागत होत असून, त्यांच्या या निर्णयामुळे अवयवदानाबाबत जनजागृतीला नवी दिशा मिळेल आणि अधिकाधिक नागरिक या जीवनदायी चळवळीत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0