कोल्हापुरातील एमएसएमईंनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

कोल्हापुरातील उद्योगांमध्ये मोठी वाढीची क्षमता असून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन निर्यात वाढवावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

कोल्हापुरातील एमएसएमईंनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
जिष्णु देव वर्मा, कोल्हापूर, एमएसएमई, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, निर्यात, FIEO, MSSIDC, रिव्हर्स बायर सेलर मिट, कोल्हापूर निर्यात, महाराष्ट्र निर्यात, उद्योग, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, RAMP, आंतरराष्ट्रीय खरेदीदार

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २९ : कोल्हापूरमध्ये उद्योगवृद्धीची मोठी क्षमता असून येथील विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. ज्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी अद्याप निर्यातीला सुरुवात केलेली नाही, त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन निर्यातीच्या नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

हॉटेल सयाजी येथे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) यांच्या वतीने आयोजित ७ व्या रिव्हर्स बायर-सेलर मिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, FIEOचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय, MSSIDCच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती प्रेरणा देशभ्रतार तसेच FIEOचे प्रादेशिक अध्यक्ष खुशवंत जैन उपस्थित होते.

एमएसएमई क्षेत्राचा निर्यातीत मोठा वाटा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून देशाच्या एकूण निर्यातीत या क्षेत्राचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या क्षेत्रांमध्ये एमएसएमईचा समावेश होतो.

देशातील उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनून आपली दर्जेदार उत्पादने जगभरातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र हे देशातील गतिमान आर्थिक शक्ती केंद्रांपैकी एक असल्याचेही राज्यपालांनी नमूद केले.

गेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राची सुमारे ६९.९ अब्ज अमेरिकी डॉलरची वस्तू निर्यात झाली असून त्यामध्ये कोल्हापूरची निर्यात सुमारे ७२२ दशलक्ष अमेरिकी डॉलर असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

दोन दिवसीय रिव्हर्स बायर-सेलर मिट हे आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि निर्यातदार यांच्यासाठी थेट व्यावसायिक संवाद साधण्याचे उपयुक्त व्यासपीठ असल्याचेही त्यांनी सांगितले.

RAMP उपक्रमातून एमएसएमईंच्या क्षमतेला चालना

MSSIDCच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी RAMP अर्थात Raising and Accelerating MSME Performance हा केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले.

जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योगांची क्षमता विकसित करणे, बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविणे आणि संस्थात्मक क्षमता मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

FIEOचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय यांनी महाराष्ट्र निर्यात क्षेत्रात आघाडीवर असून देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगितले. या मेळाव्याचा उद्योजकांनी अधिकाधिक उपयोग करून संभाव्य व्यावसायिक भागीदारांशी संवाद साधावा, नव्या संधींचा शोध घ्यावा आणि दीर्घकालीन व्यावसायिक संबंध निर्माण करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

२७ देशांतील ५२ हून अधिक खरेदीदारांचा सहभाग

या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संपर्क मेळाव्यात २७ देशांतील ५२ हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार, तर महाराष्ट्रातील ४५० हून अधिक एमएसएमई सहभागी झाले आहेत.

मेळाव्यात कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, अभियांत्रिकी उत्पादने, वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, कपडे व कापड, हस्तकला तसेच चांदीचे दागिने यांसह विविध उत्पादनांचा समावेश आहे.

राज्यातील एमएसएमईंना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट व्यावसायिक संपर्क साधता यावा, नवीन निर्यात बाजारपेठांचा शोध घेता यावा आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेशाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यपालांकडून स्टॉलला भेट

कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मेळाव्यात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन उद्योजक व स्टॉलधारकांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेत त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधींबाबतही चर्चा केली.