प्रलंबित ॲट्रॉसिटी प्रकरणांचा पाठपुरावा करून विहित मुदतीत कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करून विहित मुदतीत कारवाई करावी आणि पीडितांना लवकर न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

Jul 30, 2026 - 23:37
 0  9
प्रलंबित ॲट्रॉसिटी प्रकरणांचा पाठपुरावा करून विहित मुदतीत कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर ॲट्रॉसिटी प्रकरणे, प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा

कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. ३० : अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करून संबंधितांवर विहित मुदतीत कारवाई करावी. तसेच पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, पोलीस तपासावरील सर्व प्रकरणांचा आवश्यक तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा. दोषींविरुद्ध विहित कालावधीत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने प्रभावी कार्यवाही करावी. तसेच तपासाधीन प्रकरणांना गती देऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रलंबित प्रकरणांवरील कार्यवाहीला गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीत समाज कल्याण आयुक्त सचिन साळे यांनी सद्यस्थितीत पोलीस तपासावर ११ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती दिली. या प्रकरणांचा पाठपुरावा करून तपास प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, ॲट्रॉसिटीच्या अनुषंगाने गावोगावी नागरिकांचे प्रबोधन करण्यात यावे, अशी सूचना समितीचे अशासकीय सदस्य संजय कांबळे यांनी केली. अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती देणे तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आढावा बैठकीस होम डिवायएसपी तानाजी सावंत, डॉ. सुनील कुरुंदवाड, सरकारी विधिज्ञ पी. जे. जाधव, पोलीस निरीक्षक नयना पाटील, एलसीबी पथकाचे निवृत्ती माळी यांच्यासह समितीचे इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.