नवरात्रोत्सवापूर्वी महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे निर्देश
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेली कामे नवरात्रोत्सवापूर्वी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. ८ : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेली कामे नवरात्र महोत्सवापूर्वी वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित विभागांना दिले. आगामी ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील कामांचा आढावा घेण्यासाठी शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली.
मंदिराचा मूळ ऐतिहासिक ढाचा अबाधित ठेवून पुरातत्त्व विभागाने विकास व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. नवरात्रोत्सवाच्या काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे ११ ऑक्टोबरपर्यंत मंदिर दर्शनासाठी अडथळाविरहित खुले राहील आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी मंदिर समिती व पुरातत्त्व विभागाने समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
मंदिर दुरुस्ती व वायरिंगबाबत विशेष दक्षता
मंदिराच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये पुरातत्त्व विभागाने तांत्रिक बाबींची अचूकपणे पूर्तता करावी. विशेषतः विद्युत वायरिंगच्या कामात सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.
नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने मनकर्णिका कुंडावर दीपोत्सव आयोजित करता येईल का, याची शक्यता तपासून पाहावी, अशी अपेक्षाही त्यांनी मंदिर समितीसमोर व्यक्त केली.
सीसीटीव्हीचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार
बैठकीत विविध कामांच्या प्रगतीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेच्या कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टी यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्हीचे काम आगामी दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती दिली.
तर पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी मनकर्णिका कुंडाचे तसेच मंदिरातील फरशीचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील विकासकामे, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधांचा समन्वय साधून कामे पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मस्के, शहर अभियंता (महापालिका) रमेश मस्कर, भूमी संपादन विशेष अधिकारी प्रियंका धनवडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.