महालक्ष्मी देवस्थान परिसर विकासासाठी प्राथमिक सर्वेक्षणास सुरुवात

कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान परिसर विकासासाठी प्राथमिक सर्वेक्षणास सुरुवात झाली असून १३७ सिटी सर्व्हे क्रमांकांचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी ३५ सर्वे पूर्ण झाले असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

May 5, 2026 - 00:08
 0  4

कोल्हापूर, दि. ०४ : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) देवस्थान परिसराच्या विकास आराखड्यांतर्गत प्राथमिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण तीन स्वतंत्र पथकांमार्फत राबविले जात असून प्रत्येक पथकात कोल्हापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता पथकप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

प्रत्येक पथकात एक ग्राम महसूल अधिकारी, एक परिरक्षण भूमापक तसेच घरफाळा विभागाचे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणामध्ये एकूण १३७ सिटी सर्व्हे क्रमांकांचा समावेश असून पहिल्याच दिवशी ३५ सिटी सर्व्हे क्रमांकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे, तर ७ क्रमांकांचे काम अंशतः पूर्ण झाले आहे.

सर्वेक्षण प्रक्रियेला मिळकतधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी मालकांच्या अनुपस्थितीत कुळ वास्तव्यास असल्याने संबंधित मालकांशी संपर्क साधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

या प्राथमिक सर्वेक्षणातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे महालक्ष्मी देवस्थान परिसर विकासाच्या पुढील टप्प्यांची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0