‘माझे शहर, माझी जबाबदारी’ उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश; पिंपरी चिंचवड महापालिकेची जनजागृती मोहीम
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी शहराला अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पिंपरी, दि. २३ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “क” क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ०६ पांडवनगर, भोसरी येथे “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” संदर्भात नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित नागरिकांना सामूहिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
“माझे शहर, माझी जबाबदारी” या अभियानाअंतर्गत महापालिकेकडून शहरभर विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. भाजी मंडई, रस्त्यावरील व्यावसायिक, चौक-रस्ते, सिग्नल, बस स्थानके तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.
या उपक्रमात नागरिकांना स्वच्छाग्रही म्हणून विविध प्रतिज्ञा देण्यात आल्या. यात कचरा न टाकणे, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर, ओला-सुका व घातक कचरा वेगळा करून देणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा लघुशंका न करणे, तसेच शहर विद्रूप होणार नाही याची काळजी घेणे यांचा समावेश होता. “माझे शहर, माझी जबाबदारी” या भावनेतून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाची अंमलबजावणी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल तसेच सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहर “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” मध्ये अग्रस्थानी राहावे, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.
“स्वच्छता ही प्रत्येक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास पिंपरी चिंचवड शहर निश्चितच स्वच्छ सर्वेक्षणात अग्रस्थानी राहील.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0