“आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होऊ देणार नाही” – आमदार सत्यजीत तांबे

शिरपूर येथे आयोजित नाशिक विभागातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांच्या बैठकीत आमदार सत्यजीत तांबे यांनी आश्रमशाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करत हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात शासनासमोर मांडण्याचे आश्वासन दिले.

May 29, 2026 - 19:59
 0  10
“आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होऊ देणार नाही” – आमदार सत्यजीत तांबे
सत्यजीत तांबे, आदिवासी आश्रमशाळा, शिरपूर बैठक

नाशिक ब्यूरो |

शिरपूर 

“आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न अत्यंत संवेदनशील असून त्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील विविध प्रश्न शासनासमोर ठामपणे मांडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या वतीने आयोजित नाशिक विभागातील संस्थाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते. किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर येथे झालेल्या या बैठकीस राज्यभरातील संस्था चालक, पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना भेडसावणाऱ्या आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध आदेशांमुळे शाळा चालविताना निर्माण होणाऱ्या अडचणी, निधी वितरणातील विलंब, शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक सुविधा तसेच दैनंदिन कामकाजातील अडथळ्यांबाबत संस्थाचालकांनी आपल्या समस्या मांडल्या.

आमदार सत्यजीत तांबे यांनी आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा वेध घेण्यासाठी आणि शिक्षण प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठकीस माजी खासदार बापू चौरे, नाशिक जिल्हाध्यक्ष शिवराम झोले, धुळे जिल्हाध्यक्ष पोपटराव सोनवणे, नंदुरबार सरचिटणीस युवराज पाटील, नागपूर सरचिटणीस राजेंद्र सरोदे, आयोजक तुषार रंधे तसेच डॉ. शशिकांत वाणी यांच्यासह नाशिक विभागातील विविध संस्था प्रमुख उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.