पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या तपपूर्तीनिमित्त पुण्यात ‘नरसिंह महायज्ञ’चे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त पुण्यात 9 जून रोजी ‘नरसिंह महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रकल्याण, विकसित भारत संकल्पना आणि देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या तपपूर्तीनिमित्त पुण्यात ‘नरसिंह महायज्ञ’चे आयोजन
पुण्यात 9 जूनला नरसिंह महायज्ञ; मोदी सरकारच्या 12 वर्षांनिमित्त विशेष आयोजन

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने पुण्यात विशेष ‘नरसिंह महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या यशासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्याच्या उद्देशाने हा धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवार, 9 जून 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता कात्रज येथील श्रीकृष्ण मंदिर, इस्कॉन (एनव्हीसीसी अण्णामृत) येथे या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक माऊली थोरात, ॲड. मोरेश्वर शेडगे, ज्येष्ठ नेते विजय शिनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमर साबळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राद्वारे देशात विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. सत्तेला उपभोगाचे साधन न मानता राष्ट्रसेवेची तपश्चर्या मानून त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या माध्यमातून देशाला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

महायज्ञामध्ये लक्ष्मी-नारायणाच्या स्वरूपात अनेक दाम्पत्ये सहभागी होऊन राष्ट्रकल्याणाचा संकल्प करणार आहेत. देशाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी विशेष प्रार्थना केली जाणार आहे.

यावेळी मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील विविध लोककल्याणकारी योजनांचाही उल्लेख करण्यात आला. गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा विकास, मेक इन इंडिया, राष्ट्रीय सुरक्षा, महिला सक्षमीकरण तसेच भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा यांसारख्या उपक्रमांमुळे देशाच्या विकासाला गती मिळाल्याचे वक्त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी सांगितले की, नरसिंह महायज्ञाच्या माध्यमातून विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी, राष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.