नाशिक जिल्हा परिषदेला मानाचा तुरा; धोंडेगाव आरोग्य केंद्राला NQAS मानांकन, ९४.४६% गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्र सरकारकडून NQAS मानांकन मिळाले असून ९४.४६% गुणांसह राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत ही मोठी कामगिरी मानली जात आहे.

May 4, 2026 - 20:02
 0  1
नाशिक जिल्हा परिषदेला मानाचा तुरा; धोंडेगाव आरोग्य केंद्राला NQAS मानांकन, ९४.४६% गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र
नाशिक आरोग्य केंद्र, NQAS मानांकन, धोंडेगाव PHC, राष्ट्रीय गुणवत्ता

नाशिक ब्यूरो 

नाशिक : ग्रामीण आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या धोंडेगाव (ता. नाशिक) प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्र सरकारचे प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक’ (NQAS) प्रमाणपत्र जाहीर झाले आहे.

National Health Systems Resource Centre (NHSRC) तर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार, धोंडेगाव आरोग्य केंद्राने ९४.४६ टक्के असे उच्चांकी गुण मिळवत Quality Certified मानांकन प्राप्त केले आहे. यापूर्वी उसवाड, जातेगाव, मोहाडी, खामखेडा आणि ओझर या केंद्रांनीही हे मानांकन मिळवले असून आता जिल्ह्यातील अशा केंद्रांची संख्या ६ झाली आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने दोन दिवसांची बाह्य तपासणी (External Assessment) केली होती. यामध्ये OPD, IPD, प्रसूती कक्ष, प्रयोगशाळा, औषध उपलब्धता, संसर्ग नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि रुग्णांचे हक्क अशा सर्व घटकांची सखोल पडताळणी करण्यात आली. रुग्णाभिमुख सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत केंद्राने ९०.६७ टक्के Patient Satisfaction Score मिळवला आहे.

या राष्ट्रीय मानांकनामुळे केंद्राला अतिरिक्त प्रोत्साहन निधी मिळणार असून, त्याचा वापर आरोग्य सुविधा अधिक आधुनिक आणि दर्जेदार करण्यासाठी केला जाणार आहे.

हे यश मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, डॉ. हर्षल नेहेते, डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. दिपक लोणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या मानांकनामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल.”

तर डॉ. शैलेश निकम यांनी सांगितले की, “हे यश संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून भविष्यातही दर्जा टिकवून अधिक सक्षम सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

धोंडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेले हे मानांकन नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0