नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ बोधचिन्हाचे मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते अनावरण
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. देशव्यापी स्पर्धेतून निवडलेल्या या लोगोमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले आहे.
मुंबई, दि. १३ :
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने देशव्यापी लोगो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देश-विदेशातील सुमारे ३ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पंढरपूर येथील पीयूष पिंपळनेरकर यांना एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या नामांकित डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित निवड प्रक्रिया पार पडली. या समितीचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना कुंभमेळा आयोजन तसेच लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.
यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह तसेच विविध आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित साधू-संतांचे स्वागत केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाची वैशिष्ट्ये
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, ‘मायगव्ह’ आणि ‘असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशव्यापी स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या.
सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. १८ ते २४ वयोगटातील तरुणांनी सर्वाधिक सहभाग नोंदवला.
या बोधचिन्हामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले आहे.
भगवान शंकराचे त्रिशूळ – आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक
त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती – प्रादेशिक वारशाचे दर्शन
काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी – पवित्र स्नान परंपरेचे प्रतीकात्मक चित्रण
गोदावरी नदीला ‘शिवलिंगा’च्या स्वरूपात दर्शविण्यात आले असून कुंभमेळ्याच्या धार्मिक महत्त्वाला अधोरेखित करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0