नाट्यगृहांच्या भाडेवाढीत मोठा दिलासा; आता दरवर्षी केवळ 1 ते 2 टक्के वाढ – मंत्री आशिष शेलार
मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या भाड्यात दरवर्षी होणारी 5 टक्के वाढ कमी करून 1 ते 2 टक्के करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. कोविडपूर्वीचा मूळ भाडेदर आधार मानण्यासह नाट्यसृष्टीसाठी गोडाऊन आणि वाहनतळाच्या प्रश्नावरही महिनाभरात व्यवहार्य पर्याय सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुंबई | प्रतिनिधी : संदीप गिरकर
मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये दरवर्षी करण्यात येणारी 5 टक्के वाढ कमी करून केवळ 1 ते 2 टक्के करण्याबाबत शासन सकारात्मक असून, भाडेवाढीसाठी कोविडपूर्वीचा मूळ भाडेदरच आधार मानण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. तसेच मराठी नाट्यसृष्टीच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोडाऊन आणि वाहनतळाच्या प्रश्नावर महिनाभरात व्यवहार्य पर्याय सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते प्रसाद मच्छिंद्र कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे प्रतिनिधी, विविध महानगरपालिकांचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नाट्यगृहांच्या देखभाल, दुरुस्ती आणि वीज खर्चात वाढ होत असतानाही मराठी नाट्यसृष्टीवरील आर्थिक भार कमी करण्यावर भर देण्यात आला. महानगरपालिकांची आर्थिक शाश्वतता आणि नाट्यसृष्टीचे हित यांचा समतोल राखत दरवर्षीची 5 टक्के भाडेवाढ कमी करून 1 ते 2 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याबाबत संबंधित महानगरपालिका आणि स्थायी समित्यांनी फेरविचार करावा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
यावेळी नाट्य व्यावसायिकांनी दादर, परळ, लालबाग आणि शिवडी परिसरात नाट्यसाहित्य, नेपथ्य तसेच बस पार्किंगसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सध्या उपलब्ध जागा अपुरी असून पावसाळ्यात नेपथ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. व्यावसायिक दराने गोडाऊन घेणे परवडत नसल्याने शासन किंवा महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
या मागणीची दखल घेत मंत्री आशिष शेलार यांनी मानखुर्द येथील अतिक्रमणमुक्त जागांपैकी काही जागा नाट्यसृष्टीसाठी गोडाऊन आणि वाहनतळासाठी उपलब्ध करून देता येतील का, याबाबत महिनाभरात व्यवहार्य प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनाही पर्यायी जागेचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले.
दरम्यान, महानगरपालिका नाट्यगृहांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, एलईडी जाहिरात फलक आणि इतर उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी पुढील तीन महिन्यांत विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देशही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
दशावतार कलाकारांच्या सर्वेक्षणासाठी विशेष नोंदणी मोहीम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय येथे विशेष नोंदणी कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. देवगड, कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या आठही तालुक्यांमध्ये कलाकारांची नोंदणी केली जाणार आहे.
या सर्वेक्षणाद्वारे दशावतार कलाकार, मंडळे आणि या लोककलेशी संबंधित विविध घटकांची अद्ययावत माहिती संकलित करून लोककलेचे संवर्धन, दस्तऐवजीकरण आणि भविष्यातील सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांनी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या विशेष नोंदणी कक्षात जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.