निगडी येथे ‘आपली जनगणना, आपला विकास’ प्रशिक्षणास सुरुवात; ५२५ प्रगणकांना मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागात आगामी जनगणना २०२६-२७ मोहिमेसाठी निगडी येथे प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली असून ५२५ जणांना तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे.

निगडी येथे ‘आपली जनगणना, आपला विकास’ प्रशिक्षणास सुरुवात; ५२५ प्रगणकांना मार्गदर्शन
जनगणना 2026, पिंपरी चिंचवड महापालिका,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात आगामी जनगणना २०२६-२७ मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी निगडी येथे प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या तांत्रिक बाबी तसेच क्षेत्रीय कामकाजाचे सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. २५ एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचा कालावधी ८ मेपर्यंत असणार आहे. अ प्रभागातील एकूण १२ बॅचेसमध्ये सुमारे ५२५ प्रगणकांना दररोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक बॅचमध्ये सुमारे ५० प्रशिक्षणार्थी सहभागी होत असून त्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

जनगणना कार्यालयाने नियुक्त केलेले अनुभवी स्किल फील्ड ट्रेनर्स श्री. राजू कोंढवडे, श्री. केदार शंकर, श्री. प्रणव गुरव आणि तुषार बारगे हे प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देत आहेत.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे, अ प्रभाग अधिकारी सौ. निवेदिता घारगे तसेच इतर अधिकाऱ्यांनी जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्य असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. १ ते १५ मे दरम्यान नागरिकांनी स्वतःची स्वगणना ॲपवर नोंदवावी तसेच १६ मेनंतर प्रगणक घरी आल्यास अचूक माहिती देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या प्रशिक्षण उपक्रमात प्रगणक श्री. बाळू महाजन, गोरक्ष पवार, संदीप बोंबले, राजेंद्र पाटील, बाबुराव भोसले, सौ. दिपाली मोहिते, डॉ. माधुरी पवार, नीता वाघमारे, तनुजा नेमाडे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रास्ताविक श्री. बाळू महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. पोटघन शाम यांनी मानले.