‘पंढरीची वारी’ माहितीपटातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक दर्शन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रीमियर शो
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत विशेष प्रीमियर शो पार पडला. हा माहितीपट महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर पोहोचवणारा ठरणार आहे.
मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे
महाराष्ट्राच्या शतकानुशतकांच्या वारकरी परंपरेचा, भक्तीभावाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा जागतिक स्तरावर परिचय करून देणारा ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा माहितीपट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील आयनॉक्स चित्रपटगृहात विशेष प्रीमियर शोद्वारे प्रदर्शित करण्यात आला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या २२ मिनिटांच्या माहितीपटातून पंढरीच्या वारीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व प्रभावीपणे उलगडण्यात आले आहे.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा माहितीपट मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये डब करण्यात आला असून डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, अॅनिमल प्लॅनेट, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (ID), डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी टर्बो यांसह एकूण नऊ उपग्रह वाहिन्यांवर त्याचे प्रसारण होणार आहे.
माहितीपटात पंढरपूर वारीतील समता, भक्ती, वारकरी परंपरा, रिंगण सोहळा, चंद्रभागा नदीचा घाट, टाळ-मृदुंगाचा गजर, अबीर-गुलालाची उधळण आणि विठ्ठल भक्तांचा निस्सीम श्रद्धाभाव यांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आकर्षक चित्रीकरण करण्यात आले आहे. वारीतील प्रत्येक क्षण जिवंत करत हा माहितीपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे प्रभावी दस्तऐवजीकरण ठरतो.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशातील भक्ती परंपरेतील वारी ही सर्वात प्राचीन आणि प्रेरणादायी परंपरा आहे. धर्म, जात, भाषा किंवा आर्थिक स्तराचा कोणताही भेद न करता सर्वांना एकत्र आणणारी ही वारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या माहितीपटातून वारीचे उद्दिष्ट, तिच्यामागील प्रेरणा, वारकऱ्यांची श्रद्धा आणि परंपरेचे महत्त्व प्रभावीपणे जगासमोर मांडण्यात आले आहे. महाराष्ट्राची ही अमूल्य सांस्कृतिक परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविणारे हे अत्यंत स्तुत्य पाऊल आहे."
मुख्यमंत्र्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, हा माहितीपट जगभरातील प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची ओळख करून देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2