अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती; हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई – तृप्ती सांडभोर
पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि विनापरवाना टपऱ्यांवर कारवाईला गती देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले. कारवाईत दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच अनधिकृत टपऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करून निष्कासनाची मोहीम जलद गतीने राबवावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले. अतिक्रमण निष्कासन कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृहात शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता सुनील बागवानी यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच बीट निरीक्षक उपस्थित होते.
बीट निरीक्षकांच्या कामकाजाचा आढावा
बैठकीमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत कार्यरत बीट निरीक्षकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक बीट निरीक्षकाने आपल्या नेमून दिलेल्या क्षेत्राची नियमित पाहणी करावी. नव्याने सुरू झालेली तसेच सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे ओळखून त्यांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिल्या.
सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार तातडीने निष्कासनाची कारवाई करण्याचे नियोजन करावे. कारवाईसाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि इतर साधनसामग्रीचे योग्य नियोजन करून मोहीम प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या भूखंडांवरील अतिक्रमणांना प्राधान्य
महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर झालेली अतिक्रमणे तसेच अनधिकृत आणि विनापरवाना टपऱ्यांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
यासोबतच सार्वजनिक पदपथांवर झालेली अतिक्रमणे निष्कासित करून नागरिकांसाठी पदपथ मोकळे व वापरायोग्य ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून कारवाई करा
अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांच्या प्रकरणांमध्ये केवळ नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संबंधित क्षेत्राची नियमित पाहणी करून स्वतःहून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे शोधून त्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश तृप्ती सांडभोर यांनी दिले.
शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित गस्त व पाहणी करावी. अनधिकृत बांधकामे सुरू होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांची दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
हलगर्जीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित
अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई, दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. संबंधित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी स्पष्ट केले.
शहरातील सार्वजनिक जागा, पदपथ आणि महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांचे संरक्षण करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावी पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाईला आगामी काळात अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.