नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा; शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई युद्धपातळीवर पूर्ण करून नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत तसेच शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत जाहिरातदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

May 27, 2026 - 04:37
 0  3
नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा; शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड महापालिका, डॉ विजय सूर्यवंशी, नालेसफाई

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २५ मे २०२६ : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत तसेच अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर आणि पत्रकांद्वारे शहर विद्रुप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उपआयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नालेसफाई, शहर स्वच्छता, अनधिकृत जाहिराती, जलतरण तलाव व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, पावसाळ्यात पाणी तुंबणे टाळण्यासाठी नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहणे अत्यावश्यक आहे. नाला बुजविणे किंवा नाल्यांवरील अतिक्रमणांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.

औद्योगिक क्षेत्रातील नाल्यांची स्वच्छताही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यासाठी उद्योजक, औद्योगिक विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय बैठक घेण्यात येणार आहे.

शहर सुशोभीकरणावर भर

रस्ते दुभाजक, चौक, बसथांबे, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व आकर्षक ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण, झाडांची छाटणी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यावर भर देण्यात येणार आहे.

अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर्स, स्टिकर्स आणि पत्रके लावून शहर विद्रुप करणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

महापालिकेच्या आरोग्य विभागाने ३१ मेपर्यंत शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शहरातील १४१ नाल्यांपैकी ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांपैकी आतापर्यंत ८५.८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास आणि ड्रेनेज लाईनच्या कामांमुळे काही भागांमध्ये अडचणी निर्माण होत असल्या तरी पर्यायी नियोजन करून काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन

महापालिकेने नागरिकांना नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखावी आणि शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, "पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नालेसफाई आणि पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात आहेत."

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0