आषाढी वारीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची तयारी वेगात; वारकऱ्यांसाठी विविध सुविधांचे नियोजन
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विविध सामाजिक, स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्थांसोबत समन्वय बैठक घेतली. वारीदरम्यान सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजनाला गती देण्यात आली आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. 19 : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांना आरोग्य, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय बैठक आयोजित केली. उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक पार पडली.
बैठकीत आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी केंद्रांचे नियोजन, स्वच्छता व्यवस्थापन, सुलभ शौचालयांची व्यवस्था, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. यावेळी वारी मार्गावरील विविध सेवा-सुविधांचा आढावा घेण्यात आला तसेच संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन सर्व नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, अतुल सोनवणे, महेश आढाव, राजेश भाट, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, वैशाली ननावरे यांच्यासह विविध सामाजिक, स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यामध्ये सीवायडीए, बिसलेरी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल गव्हर्नमेंट, संस्कार प्रतिष्ठान, श्री अग्रसेन ट्रस्ट, ईसीए, प्रतिभा कॉलेज, संजीवनी स्वयंसेवी संस्था, अंकुश फाऊंडेशन, ज्ञानगंगा फाऊंडेशन, अल्फा फाऊंडेशन, नंदनवन कुष्ठपीडित संस्था, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हाळसाकांत विद्यालय, सूर्यमुखी हनुमान प्रतिष्ठान, रामकृष्ण मोरे महाविद्यालय, ह्यूमन राईट्स असोसिएशन, संत निरंकारी मंडळ, निर्मल वारी, यशस्वी ग्रुप, आरंभ महिला बचत गट आणि यशोधरा महिला बचत गट यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
वारीदरम्यान वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संस्थांनी महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. महापालिका आणि विविध संस्थांच्या समन्वयातून वारकऱ्यांसाठी अधिक प्रभावी आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यातp आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0