घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा जनजागृती उपक्रम; कचरा चार प्रकारांत विलगीकरणाचे आवाहन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घरगुती कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे विलगीकरण करून घंटागाडीला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : घरगुती कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरभर व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरातून निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारांत विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगत आहेत. तसेच विविध सोसायट्या, वस्त्या आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, प्रबोधन मोहीम आणि नागरिकांशी थेट संवाद साधून घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा योग्य पद्धतीने विलगीकरण करून देणे बंधनकारक आहे. कचरा स्वतंत्रपणे संकलित केल्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे अधिक सुलभ होते. पुनर्वापराला चालना मिळते, कचरा प्रक्रिया अधिक परिणामकारक होते आणि लँडफिलवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होते.
याबाबत महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक घरातून कचऱ्याचे चार प्रकारांत योग्य विलगीकरण झाल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम आणि प्रभावी होईल. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करावे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, स्रोतस्थळी कचरा विलगीकरण हा शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा मूलभूत टप्पा आहे. ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे दिल्यास कचरा प्रक्रियेला गती मिळते आणि स्वच्छ शहराच्या उद्दिष्टपूर्तीस मोठी मदत होते.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले की, शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांशी थेट संवाद साधून कचरा विलगीकरणाबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. नागरिकांचा सहभाग वाढवून कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक करण्यावर महापालिका भर देत आहे.
महापालिकेने सर्व नागरिकांना घरगुती कचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण करून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड शहर उभारण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0