पुणे–लोणावळा तिसऱ्या-चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना
पुणे–लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे काम गतीने पूर्ण करून निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रशासनाला केली. चिंचवडसह प्रमुख स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबे आणि प्रवाशांसाठी अतिरिक्त सुविधा देण्याची मागणीही करण्यात आली.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पिंपरी : पुणे–लोणावळा रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी गर्दी आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला गती देऊन ते पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा स्पष्ट करावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रशासनाला केली.
तळेगाव, पिंपरी, देहूरोड आणि चिंचवड या प्रमुख स्थानकांवर मेल व एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्यासोबतच प्रवाशांसाठी अतिरिक्त आरक्षित डब्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव आणि लोणावळा स्थानकांवर सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक सुधारणा करून ती कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुणे, मावळ, पिंपरी-चिंचवड तसेच सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग सोनवणे, विशाल पाटील, डॉ. अमोल कोल्हे, भास्कर भगरे, मेधा कुलकर्णी, ज्योती वाघमारे, बालाजी काळगे, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कृष्ण किशोर मिश्रा, पुणे रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर, मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार गुप्ता यांच्यासह रेल्वे विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी
पुणे–लोणावळा रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम महत्त्वाचे आहे. या कामाला गती देऊन काम पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा रेल्वे प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
दुपारच्या वेळेत प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन पुणे–लोणावळा मार्गावर अतिरिक्त लोकल सेवा सुरू करावी, तसेच कोविड काळात बंद करण्यात आलेले रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
प्रगती, महालक्ष्मी आणि चेन्नई एक्स्प्रेसला चिंचवडमध्ये थांबा द्या
पुण्याकडून मुंबई आणि अन्य महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आवश्यक अतिरिक्त सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी बारणे यांनी केली.
प्रगती एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि चेन्नई एक्स्प्रेसला चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
तसेच सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत सुरू करावी आणि बारामती–कर्जत पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
कामशेत, मळवली आणि वडगाव परिसरातील प्रश्न सोडविण्याची सूचना
कामशेत एलजी गेट क्रमांक ४२ येथील सबवेमध्ये पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आरओबी अथवा योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मळवली एलजी गेट क्रमांक ३२ येथील प्रलंबित आरओबीचे काम लवकर पूर्ण करून पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करावी. तसेच केशवनगर–वडगाव गेट क्रमांक ४९ जवळील अंडरपास सुरू करावा, अशी सूचना बारणे यांनी केली.
जांभुळवाडी येथील अंडरपासजवळील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे आणि पाणी साचण्याची समस्या दूर करावी तसेच संबंधित काम पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.
फुगेवाडीतील मार्ग नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी
फुगेवाडी येथे सुरू असलेल्या पुश पुलाच्या कामामुळे स्मशानभूमी आणि दफनभूमीकडे जाणारा पूर्वीचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आरटीओशी समन्वय साधून हा मार्ग लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी पायी जाण्याचा मार्ग उपलब्ध ठेवण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
अमृत भारत स्टेशन योजनेतील कामांना गती देण्याची सूचना
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव आणि लोणावळा रेल्वे स्थानकांवर विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये आवश्यक सुधारणा करून कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना बारणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील वाढती लोकसंख्या, प्रवाशांची वाढती संख्या आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता रेल्वे सुविधा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून प्रवाशांना सुरक्षित, सुविधाजनक आणि वेळेवर रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.